गड किल्ले भाड्याने दिल्यास उग्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:35 AM2019-09-10T11:35:47+5:302019-09-10T11:37:55+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात गडकोट किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र शासनाने हे किल्ले विकसकांना भाड्याने देण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला डिवचले आहे. हा निर्णय शासनाने त्वरित मागे न घेतल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोमवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात गडकोट किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र शासनाने हे किल्ले विकसकांना भाड्याने देण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला डिवचले आहे. हा निर्णय शासनाने त्वरित मागे न घेतल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोमवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे.
काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत किल्ल्यांची वर्गवारी करून काही किल्ले विकसकांना भाडेतत्वावर देण्याचे ठरले आहे. त्या ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालय, लॉज व अन्य व्यवसायाची परवानगी देण्यात येणार आहे.
स्वराज्य निर्मिती करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या शौर्य व बुद्धिमत्तेबरोबरच गनिमी कावा, युद्धनीती व गड-किल्ल्यांची महत्त्वाची साथ लाभली. महाराजांनी किल्ले बांधणीबरोबरच काही किल्ले जिंकून त्यांची डागडुजी करून त्यांचा विकास केला.
हे किल्ले महाराष्ट्राची शान व अस्मिता असून, त्यांचे पावित्र्य व इतिहास चिरंतन राहिले पाहिजे; मात्र शासनाच्या निर्णयामुळे किल्ल्यावर अवैध धंद्याचीही निर्मिती होण्याची शक्यता आहे; त्यामुळे हा अविचारी निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा.
शिष्टमंडळात शहर काँग्रेस अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अॅड. गुलाबराव घोरपडे, संपतराव पाटील, किशोर खानविलकर, तौफिक मुल्लाणी, प्रताप जाधव, मंगल खुडे, रणजित पोवार, उदय चव्हाण, किरण मेथे, संग्राम गायकवाड, संजय पोवार, संध्या घोटणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.