कोल्हापूर : फुटबाॅल म्हटले की, पेठापेठांमधील इर्ष्या स्थानिक संघातील सामन्यांतून आतापर्यंत दिसून आली आहे. त्यात वर्ल्डकपची धुम रविवारी (दि. २०) पासून कतारमध्ये सुरू होत आहे. हा जगभरातील फुटबाॅल शौकिनांसाठी दुग्धशर्करा योग आहे. मग त्यात कोल्हापुरातील शौकीन कसे मागे राहतील. भलेही भारताचा संघ नसला तरी येथील शौकीन ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी आणि पोर्तुगाल संघाला सर्वाधिक पसंती देत आहेत. त्याचे प्रतिबिंब गल्लीबोळातून दिसू लागले आहे. मेस्सी (अर्जेंटिना), नेमार (ब्राझील), रोनोल्डो (पोर्तुगाल) या खेळाडूंची शहराच्या प्रमुख चौकात कटआऊट, डिजिटल फलक आणि काही घरांच्या भितींही चाहत्यांनी रंगविल्या आहेत.
कोल्हापूर म्हटले की, भारतीय फुटबाॅल विश्वात कोलकाता, गोव्यानंतरचा सर्वात मोठा चाहता वर्ग असलेले शहर म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. स्थानिक फुटबाॅलचा हंगामही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू हाेत आहे. त्यामुळे विश्वचषकासह येथील फुटबाॅल फिवरही हळूहळू चढू लागला आहे. रविवारपासून कतारमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकाची पर्वणी सुरू होत आहे. यात भारतीय संघ जरी नसला तरी कोल्हापूरकरांतील काही फुटबाॅल संघांनी ब्राझीलला अर्थात पिवळ्या निळ्याला, तर काही संघांनी अर्जेटिना अर्थात निळ्या पांढऱ्या रंगाला पसंती दर्शविली आहे. त्यानुसार संघाच्या चाहत्यांनी यापूर्वीही ज्याला समर्थन दिले ते संघ विजयी झाले आहेत. फुटबाॅल प्रेमापोटी स्थानिक फुटबाॅल शौकीन ब्राझील जिंकू दे अथवा अर्जेंटिना, फटाक्यांची आतषबाजी करून फुटबाॅलचा आनंद लुटतात. यंदाही २०२२ च्या कतारमधील विश्वचषकाची धूम कोल्हापुरातही आहे.
मेस्सी, नेमार, रोनोल्डोचीच चलती
आझाद चौकात मेस्सीचे मोठे कटआऊट लावले आहेत. तर मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीमजवळ असिफ पटेल या चाहत्याने घरावर नेमारचे कटआऊट आपल्या घरावर लावले आहे. यासह एमएमपी ग्रुपने ब्राझीलचा झेंडा लावला आहे. गुलाब गल्लीत तर वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या देशांच्या पताका लावल्या आहेत. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळजवळ विविध खेळाडूंची चित्रे भिंतीवर रंगवली आहेत. सरदार तालीमजवळ नेमार (ज्युनियर) चे पोस्टर इमारतीवर लावले आहे. शिवाजी पेठेतील सासने गल्लीत वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या सर्व देशांचे झेंडे लावले आहेत. रंकाळा चौपाटी येथे तर ब्राझीलच्या चाहत्यांनी रंकाळा उद्यानावर कटआऊट लावले आहेत. राजारामपुरीतील सायबर चौकात तर विद्युत खांबावर ख्रिस्तिनो रोनाल्डोचे भलेमोठे कटआऊट लक्ष वेधून घेत आहेत.