विश्वास पाटील ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी १५ लाखांहून अधिक महिला मतदार असूनही या निवडणुकीत फक्त इचलकरंजी मतदारसंघातून एकच महिला अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहे. उजव्या-डाव्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्यास हात आखडता घेतल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीचे बदललेले स्वरूप पाहता सामान्य कुटुंबातील महिला निवडणुकीचा विचारही करू शकत नाहीत, असे चित्र आहे.
कोल्हापूरची ओळख राज्यात ‘पुरोगामी जिल्हा’ अशी आहे. कोल्हापूर संस्थानाचीच स्थापना ताराराणी छत्रपतींनी केली आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रांत विविध स्तरांवर या जिल्ह्यातील महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा लावला आहे; परंतु तरीही विधानसभेसारख्या लोकशाहीच्या मंदिरात मात्र महिलांना फारच कमी संधी मिळाली आहे. संजीवनी गायकवाड असोत की संध्यादेवी कुपेकर; त्यांच्या पतींचे निधन झाल्यावर सहानुभूती म्हणून त्या-त्या पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यांचे स्वत:चे कर्तृत्व म्हणून ही संधी त्यांना मिळालेली नाही. मागच्या सभागृहात कोल्हापुरातून किमान एक तरी महिला आमदार होत्या. या निवडणुकीत ही जागाही कमी झाली. चंदगड मतदारसंघातून डॉ. नंदिनी बाभूळकर या सक्षम उमेदवार होत्या; परंतु राजकीय पक्षांच्या वाटमारीत त्यांना संधी मिळाली नाही. आता सर्वच उमेदवारांच्या कुटुंबातील महिला प्रचारात आघाडीवर आहेत.राजकीय पक्षांकडूनही महिलांची मते मिळावीत यासाठी त्यांचे स्वतंत्र मेळावे घेतले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत तर महिलांना साड्या वाटपाचा पॅटर्न बराच गाजला होता. या निवडणुकीतही महिला मतदारांना खूश करण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत; परंतु त्यांना उमेदवार म्हणून स्वीकारायला अजून कोल्हापूर तयार नाही.या आहेत एकमेव उमेदवारस्वत:चा स्लिपर तयार करण्याचा उद्योग असलेल्या शकुंतला ऊर्फ दिव्या सचिन मगदूम या अपक्ष म्हणून इचलकरंजी मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. गेली अनेक वर्षे त्या सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. रणरागिणी क्रांती सेनेच्या माध्यमातून त्या महिला सबलीकरणाचे काम करतात. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत बचत गटाच्या चळवळीतही त्या काम करतात. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. महिलांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी निवडणूक लढवीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.आतापर्यंत कुणी लढवली विधानसभा२००४ : शिरोळ मतदारसंघातून काँग्रेसकडून रजनी मगदूम- ४२५०७ मते२००९ : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अपक्षडॉ. निलांबरी मंडपे - ५०१ मते४२०१४ : राधानगरी मतदारसंघातून अपक्ष विजयमाला देसाई - ६१३ मते२०१४ : हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष सुरेखा कांबळे - ८४४आतापर्यंतच्या महिला आमदार१९५७ : कागल मतदारसंघातून शेकापक्षातर्फे विमलाबाई बागल१९८५ : शिरोळ मतदारसंघातून निवडणुकीत काँग्रेसकडून सरोजिनी खंजिरे ४९१०३ मते घेऊन विजयी झाल्या.२००० : शाहूवाडी मतदारसंघातून पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या संजीवनी गायकवाड या ५५ हजार २०९ मते घेऊन विजयी झाल्या.२०१२ व २०१४ : चंदगड मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून संध्यादेवी कुपेकर २०१२ पोटनिवडणुकीत आणि गेल्या निवडणुकीत ५१ हजार ५०९ मते घेऊन विजयी झाल्या.कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र (२०१९)एकूण मतदारसंघ : १०रिंगणातील उमेदवार : १०६रिंगणातील महिला उमेदवार : ०१ (इचलकरंजी मतदारसंघ)
निरीक्षण असे आहे की, द्विपक्षीय पद्धतीमध्ये महिलांना जास्त संधी मिळते. महिला जि.प. अध्यक्ष, महापौर म्हणून चांगले काम करू शकतात, तरी त्यांना विधानसभेसाठी पक्षांकडून तयार केले जात नाही.- प्रा. भारती पाटील, अधिष्ठाता, मानव्यविद्याशास्त्र विभाग