कोल्हापूर : कोल्हापूर पर्यटन महोत्सव २५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत घेण्यात येणार असून, या काळात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन खर्चात ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. राज्यातील सहल संयोजकांसाठी रविवारी आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमामध्ये व पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर श्रीमंत करण्याचे स्वप्न मांडले होते. त्यासाठी गेले दोन वर्षे आपण प्रयत्नशील होतो म्हणूनच मुंबईतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये कोल्हापूर हॉटेल मालक संघाने सहभाग घेतला. याचा दुसरा टप्पा म्हणून राज्यातील सहल संयोजकांना तीन दिवसांसाठी कोल्हापुरात आणले गेले. कोल्हापूर महोत्सवासाठी २५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत जे पर्यटक कोल्हापुरात येतील त्यांच्या निवासाच्या व भोजनाच्या खर्चामध्ये ५० टक्के सवलत दिली जाईल. तसेच त्यांना कोल्हापूर जिल्हा फिरण्यासाठी उत्तम वाहने मोफत पुरविली जातील. तसेच सहल संयोजकांनाही प्रत्येक पर्यटकामागे चांगला इन्सेटिव्ह देण्यात येईल. त्याच पद्धतीने येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापुरातील सवलत देणाऱ्या दुकानांची यादी पुरविण्यात येईल जेणेकरून पर्यटक चांगली खरेदी करू शकतील. तसेच पर्यटकांनी कोल्हापूरबाबतचे स्लोगन लिहून प्रत्येक हॉटेलमध्ये दिल्यानंतर त्यातून लकी ड्रॉच्या माध्यमातून चांगली बक्षिसेही देण्यात येतील. पुढील दोन-तीन वर्षे या क्षेत्रात शासन गुंतवणूक करेल आणि पर्यटन क्षेत्राला चालना देईल. त्यांचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरावर लवकरच एक समिती स्थापन करण्यात येऊन ही समिती पॅकेज, स्थळे, आवश्यक सुविधा यांचा आराखडा तयार करेल. शाहूंनी केलं.... आम्ही काही केलं नाही! अतिशय तळमळीने पर्यटनाबाबतचा विषय मांडताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शाहू महाराजांनी धरण बांधलं, न्यू पॅलेस बांधला, शाहू मिल उभारली; पण यातलं आम्ही नंतर काही करू शकलो नाही. ना आम्ही मोठं धरण बांधलं, ना आम्ही मिलच्या ठिकाणी दुसरा उद्योग सुरू केला. त्यामुळेच आता सर्व राजकारण विसरून कोल्हापुरात पर्यटक आल्यानंतर तो दोन दिवस राहावा यासाठी आणखी चार-पाच चांगली ठिकाणं विकसित करायला हवीत, जी पर्यटकांना आवडून जातील. पक्षी, फुलपाखरं यांचं कलेक्शन दाखवता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांचेही तोंड भरून कौतुक केले. मी जी गोष्ट त्यांना सांगतो, ती त्वरित पूर्ण करण्याचे काम जिल्हाधिकारी लगेच करतात. मी केवळ सांगून विसरून जाणारा पालकमंत्री नाही, हे माहीत असल्याने तेही तितक्याच तातडीने ही कामे पूर्ण करतात, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले. भ्रष्टाचार कमी केलाय, बचत केलीय हे सगळं करताना पहिली तीन-चार वर्षे आम्हांला कोल्हापुरात तोटा सहन करायला लागणार आहे; परंतु ती पुढची गुंतवणूक आहे. अनेकजण विचारताहेत की, पैसे कुठनं आणणार? आम्ही भ्रष्टाचार कमी केलाय, आम्ही बचत करायला लागलो आहोत. त्यामुळे चांगल्या कामाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत. म्हणूनच ‘जलयुक्त शिवार’साठी १८०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
पर्यटकांना पन्नास टक्के सवलत देणार
By admin | Published: October 17, 2016 1:03 AM