लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्याच्या शिक्षण संचालकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थिती बाबतच्या सूचना पत्राद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार इयत्ता पहिली ते नववी, अकरावीच्या ५० टक्के, तर दहावी, बारावीच्या १०० टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहायचे आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने त्याबाबतचे परिपत्रक काढल्याने शिक्षकांमधील संभ्रम दूर झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याने अनलॉकच्या चौथ्या स्तरामध्ये सध्या कोल्हापूर जिल्हा आहे. त्यामुळे येथील शाळा तूर्त तरी ऑनलाईन पद्धतीने भरणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबतची सूचना माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यानुसार शाळांनी तयारी केली आहे. समूह अध्यापन अंतर्गत विद्यार्थ्यांचे छोटे-छोटे गट करून त्यांना शिक्षण देण्याचा पर्यायही शिक्षण विभागाने सुचविला आहे. जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये कोविड केअर सेंटर आहेत, तेथील शिक्षकांनी घरातूनच ऑनलाईन स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, अशी सूचना शिक्षण विभागाने केली. मात्र, राज्याच्या शिक्षण संचालकांनी शैक्षणिक वर्ष प्रारंभाबाबत दि. १४ जूनच्या पत्राद्वारे काही सूचना शिक्षण उपसंचालकांना केल्या आहेत. त्यामध्ये शिक्षकांच्या उपस्थितीची टक्केवारी निश्चिती केली आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढले नसल्याने किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? असा प्रश्न उपस्थित झाला. माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार कार्यवाहीचे परिपत्रक काढले आहे.
जिल्ह्यातील शाळा
जिल्हा परिषद शाळा -३,०२६
विनाअनुदानित शाळा - १४०
शिक्षक -३५,०००
शिक्षकेतर कर्मचारी -२,१५७
संचालकांचे पत्र काय?
शिक्षण संचालकांच्या पत्रामध्ये इयत्ता पहिली ते नववी, अकरावीचे ५० टक्के आणि दहावी, बारावीचे १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहील. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के राहील. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या १०० टक्के उपस्थिती राहील, असे म्हटले आहे.
जिल्हा परिषदेचे पत्र?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण द्यावे. मात्र, शाळेतील उपस्थितीच्या टक्केवारीची शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रामध्ये उल्लेख नव्हता. माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार कार्यवाही करण्याचा उल्लेख आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
कोरोनाच्या ड्युटीमुळे एकूण शिक्षकांच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी शिक्षक हे शाळांमध्ये जाण्यासाठी उपलब्ध आहेत. शिक्षण संचालकांच्या पत्रातील सूचनेनुसार शिक्षकांनी शाळेतील उपस्थितीबाबत कार्यवाही करावी.
-किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी
शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि ऑनलाईन शिक्षणाबाबत प्राथमिक शाळांना सूचना दिल्या आहेत. प्राथमिक शिक्षकही कोरोना ड्युटीवर आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शाळांना पत्र पाठविण्यात येईल.
-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
शिक्षकांची कसरत
शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत कार्यवाही व्हावी. त्याबाबतचे पत्र शिक्षण विभागाने शाळांना लवकर पाठवावे. गरोदर शिक्षिका, व्याधीग्रस्त शिक्षकांना घरातून शिकविण्याची मुभा द्यावी.
-संतोष आयरे
जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता शिक्षण संचालकांचा माध्यमिक शिक्षकांच्या शाळेतील उपस्थितीबाबतचा निर्णय योग्य असून त्याचे आम्ही स्वागत करतो. सर्व शिक्षक ऑनलाईन तास घेत आहेत.
-राजेश वरक
===Photopath===
180621\18kol_1_18062021_5.jpg
===Caption===
डमी (१८०६२०२१-कोल-स्टार ८१९ डमी)