राम मगदूमगडहिंग्लज : महायुतीकडून आमदार राजेश पाटील यांचीच उमेदवारी निश्चित असली तरी भाजपचे शिवाजीराव पाटील यांनीही जोरदार फिल्डिंग लावल्यामुळे उमेदवारीचा वाद पेटण्याची शक्यता आहे. तद्वत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे नंदिनी बाभूळकर याच प्रबळ दावेदार असल्या तरी त्यांच्या उमेदवारीला ‘महाविकास’मधील काँग्रेस व उद्धवसेनेची हरकत असल्यामुळे पवारांची ‘तुतारी’ कोण वाजविणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.‘चंदगड’प्रमाणे ‘गडहिंग्लज’मध्येही गटबाजी असली तरी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून यावेळची निवडणूक राज्यातील आघाडीच्या पातळीवर नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास राजेश पाटील यांच्याविरुद्ध नंदाताई की अन्य कोण? एवढाच प्रश्न उरतो.इच्छुकांची संख्या लक्षात घेता यावेळीही बहुरंगी लढतीचीच शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारीवर एकमत न झालेस दोन्हीकडे बंडखोरी अटळ आहे. किंबहुना, त्यावेळचा निकालही बंडखोरांच्या भूमिकेवरच अवलंबून आहे.
पवारांच्या निर्णयाकडे लक्ष‘महाविकास’मधून नंदाताईंना उमेदवारी देण्यास त्यांच्याच पक्षाचे अमरसिंह चव्हाण, काँग्रेसचे गोपाळराव पाटील, अप्पी पाटील, विद्याधर गुरबे, उद्धवसेनेचे सुनील शिंत्रे, रियाज शमनजी यांची हरकत असल्यामुळे शरद पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
शिवाजीराव, मानसिंगरावही लढणार !पाच वर्षापासून तयारी करणारे शिवाजीराव पाटील तसेच राजेश पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेले मानसिंगराव खोराटे हे दोघेही रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.
भरमूअण्णा धर्मसंकटात !भरमूअण्णा पाटील हेच शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शक आहेत. परंतु, प्राप्त परिस्थितीत युतीचा धर्म म्हणून राजेश पाटील यांना पाठबळ द्यायचे, की पुन्हा शिवाजीरावांचेच सारथ्य करायचे? असेच धर्मसंकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.२०१९चा निकाल
- राजेश पाटील : ५५,५५८
- शिवाजीराव पाटील : ५१,१७३
- अप्पी पाटील : ४३,९७३
- संग्राम कुपेकर : ३३,२१५
सध्याचे मतदान :
- पुरुष : १,६२,३१०
- महिला : १.६२,६१०
- इतर : ९
- एकूण : ३,२४९२९