यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, ज्येष्ठ नेते अरुण इगंवले, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते विजय भोजे, अशोकराव माने, राहुल देसाई, विजया पाटील, प्रा. अनिता चौगुले यांच्यासह भाजपचे ग्रामीण पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गावावरच्या सत्तेसाठी दोन्ही काँग्रेससह शिवसेना सरसावली असताना भाजपनेही आता रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीच्या काळात भाजप या निवडणुका फार गांभीर्याने घेत नव्हती, परंतु पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर वाढलेल्या प्रभावाचा फायदा करून घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
स्थानिक पातळीवर कोणत्याही गटाशी आघाडी करायची असेल तर त्या त्या पातळीवर निर्णय घ्या; परंतु भाजपला मानणारे कार्यकर्ते रिंगणात उतरवा. त्यांना पक्षही पाठबळ देईल. तालुका पातळीवरील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी यासाठी समन्वय करावा, अशा सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या. विविध विकास योजनांसाठी केंद्र शासनाकडून मोठा निधी मिळतो. त्यामुळे गावपातळीवरील सत्ता ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात कुठेही कमी पडू नका, असे त्यांनी सांगितले.
चौकट
इंगवलेंच्या ऑफरबाबतही चर्चा
जिल्हा परिषदेत शुक्रवारी, दि. १८ डिसेंबर रोजी झालेल्या पुस्तक प्रकाशनावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांना सोबत येण्याची ऑफर दिली होती. याचाही विषय या बैठकीत निघाला.
बाबांच्या अनुपस्थितीची चर्चा
गेली अनेक वर्षे भाजपचे जिल्ह्यातील शिलेदार म्हणून बाबा देसाई यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, अलीकडे त्यांचा पक्षातील सक्रियपणा कमी झाल्याचे दिसते. बुधवारच्या कार्यकर्ता बैठकीतही ते दिसले नाहीत. बाबांच्या अनुपस्थितीची सध्या भाजपसह इतर पक्षांत चर्चा सुरू आहे.