कोल्हापूर : दुचाकीवरुन खाली उतर म्हटल्याच्या रागातून सोमवारी दुपारी शाहू खासबाग मैदानशेजारील खाऊ गल्लीत एका युवकास आठ ते दहाजणांनी फायटर हत्यारासह लाथा-बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करण्याची घटना घडली. या हल्ल्यात सुजय सचिन जाधव (वय १९, रा. पाटाकडील तालमीनजीक, मंगळवार पेठ) हा जखमी झाला. या प्रकारामुळे खाऊगल्लीत गोंधळ होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी सौरभ खोंद्रे, आदर्श हुलस्वार या दोघांसह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल केला.
सुजय जाधव हा महाविद्यालयीन युवक असून तो आपला मित्र शिवप्रसाद जाधव याच्यासह खाऊगल्लीत नाष्टा करण्यासाठी गेला होता. त्यांनी आपली दुचाकी खाऊगल्लीबाहेर उभी केली होती. नाष्टा करून परतल्यानंतर त्याच्या दुचाकीवर आदर्श हुलस्वार व सौरभ खोंद्रे हे बसले होते, सुजयने त्यांना गाडीवरून उतरण्यास सांगितले, त्यावरून वाद झाला. आदर्श व सौरभसह त्याच्या आठ-दहा मित्रांनी सुजयला लाथा-बुक्क्यांनी, दगडाने तसेच फायटर हत्याराने मारहाण केली. हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. नागरिकांनी त्यांच्या तावडीतून सुजयला सोडविले, त्याला जखमी अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस घटनास्थळी आले, तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते.
दरम्यान, सुजयच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली असून पाठीवर व अंगावर काठीच्या मारहाणीचे व्रण उठवले होते. त्याने रात्री दिलेल्या तक्रारीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी सौरभ खोंद्रे व आदर्श हुलस्वार या दोघांसह अज्ञात एकूण दहा जणांवर गुन्हा नोंदविला आहे.
खाऊगल्ली बनला गुंडांचा अड्डा
खाऊगल्लीत सध्या अनेक गुंडांचा वावर असल्याचे बोलले जाते. हे गुंड दिवसभर खाऊगल्लीत थांबून अनेकांना धमक्या देत असल्याच्याही तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.
फोटो नं. १५०२२०२१-कोल-सुजय जाधव
ओळ : जखमी सुजय जाधव.