शाहू स्टेडीयमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात फायटर्स ‘अ’ने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकांत सर्वबाद १३५ धावा केल्या. विनायक बावडेकरने ५१, असिमपीर मुजावरने २२ व उत्तम तनंगे, मंथन पाटील यांनी प्रत्येकी १९ धावा केल्या. गोलंदाजी करताना ‘अश्वमेध’कडून गिरीश पाटीलने तीन, अनिल सावंत व अमोल पाटील याने प्रत्येकी दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना सम्राट घोरपडे, अभिजीत लोखंडे, उत्तम तनंगे, विनायक बावडेकर यांच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. ८ बाद ९४ धावांत त्यांचा डाव गुंडाळला. त्यामुळे हा सामना अश्वमेधने ४१ धावांनी गमावला.
दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना फायटर्स ‘ब’ संघाने १५.४ षटकांत सर्वबाद ८८ धावा केल्या. भास्कर भोसले, परितोष वराडकर यांनी अनुक्रमे २५ आणि २१ धावा केल्या. कागल तालुका संघाकडून साद मुजावरने तीन, प्रवीण पिष्टे याने दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना कागल संघाने हे आव्हान सहज पार करीत विजय संपादन केला. यात रणजित निकमने २६ चेंडूंत नाबाद ५३, तर पृथ्वीराज इंगवले याने नाबाद २९ धावा केल्या. फायटर्स ‘ब’ च्या गोलंदाजांना एकही बळी घेता आला नाही.