लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांत हाणामारी झाली. यानंतर कर्मचाऱ्यांच्या समर्थकांनी काम बंद आंदोलन केले; परंतु चर्चेतून तोडगा काढून त्यावर पडदा टाकण्यात आला.
वडगाव पालिकेत कर्मचारी संघटनांची गटबाजी आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कसाब गल्ली येथील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करीत असताना ठेक्यावरील सफाई कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करीत मारहाण करण्यात आली. ही मारहाण कायम स्वरूपातील एका कर्मचाऱ्याने केली व त्याच्या अन्य चार साथीदार कर्मचाऱ्यांनी त्याला मदत केली; तर शिवीगाळ व चहाड्या करू नकोस असे सांगण्यास गेलो असता मारहाण करण्यात आली, असे दोन्हीकडून आरोप करण्यात आल्यामुळे वातावरण तंग बनले होते. त्यामुळे मारहाण केल्याच्या निषेधार्थ अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या दारात दोन ट्रॅक्टर, चार घंटागाड्या लावून तीन तासांहून अधिक वेळ ठिय्या मारला.
तत्काळ नगराध्यक्ष मोहनलाल माळी, गटनेत्या प्रविता सालपे, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे-शिंदे, अजय थोरात, शरद पाटील यांनी धाव घेतली. दोन्ही बाजू स्वतंत्रपणे ऐकून जाब विचारत चतुर्थ कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. दरम्यान, दोन्ही गट व समर्थक पोलीस ठाण्यात आले होते. प्रजापती सनदी, अमर पोवार यांनी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गैरसमजातून हा प्रकार झाला आहे. पुन्हा असा प्रकार करणार नाही, असे म्हणत यावर पडदा टाकला.
०९ वडगाव हाणामारी नावाने फोटो
फोटो ओळ : पेठवडगाव : वडगाव पालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर वाहने उभे करून ठिय्या आंदोलन केले.