नवलेवाडी गावच्या हद्दीत नदीकडे जाणाऱ्या वाटेवर मल्हारपेठ येथील पाटणकर कुटुंबीयांची शेती आहे. शेतीचे क्षेत्र सखल भागात असल्याने आजूबाजूचे पाणी त्यांच्या शेतात तुंबते. त्यामुळे पाणी निचरा होण्यासाठी सुनील पाटणकर (वय ४८) यांच्या शेतातून चर खोदलेली आहे. ही चर बुजली असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. दरम्यान, त्यांचे चुलत भाऊ पांडुरंग बापू पाटणकर यांनी ऊस लागण केेली आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने ऊस उगवण व उत्पादनावर परिणाम होऊन नुकसान होते.
त्यामुळे त्यांनी चर का बुजवलीस अशी सुनीलकडे विचारणा केली असता दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सुनील यांनी खुरप्याने वार केल्याने पांडुरंग जखमी झाले. याबाबत सुनील यांच्यावर गुन्हा नोंद झाला. पोलीस नाईक एस. एन. भोसले अधिक तपास करीत आहेत; तर पांडुरंगने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद सुनील पाटणकर यांनी दिली. याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश मालवदे करीत आहेत.