कोल्हापूर : बेळगावातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते, नामवंत वकील व समाजवादी कार्यकर्ते ॲड. राम आपटे (वय 78) यांचे आज शुक्रवारी पहाटे निधन झाले.
सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या न्यायालयीन कामकाजाचे ते समन्वयक होते. तळागाळातील लोकांची सेवा करण्यासाठी, स्वतःची जमा पुंजी रु. ५० लाख दान करून त्यांनी 'जीवनविवेक प्रतिष्ठान' ही सामाजिक विश्वस्त संस्था स्थापन केली.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अन्याय निवारण मंच, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, शोषण मुक्ती दल, जीवन शिक्षण प्रतिष्ठान, अशा बेळगावतील अनेक सामाजिक संस्थांचे ते संस्थापक व आधारस्तंभ होते. राम आपटे यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. ते विनोबांचे जन्मस्थान, गागोद्याच्या नीला आपटे यांचे काका होत.