नगरपंचायतीच्या प्रभाग पाचमध्ये गटारीच्या बांधकामावरून हातकणंगलेमध्ये माजी उपनगराध्यक्ष रणजित धनगर व पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक वाडकर यांच्यात शनिवारी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ झाली. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. धनगर समर्थकांनी केलेल्या हल्ल्यांत विजय मेंगणे हा युवक डोक्यात वीट लागल्याने गंभीर जखमी झाला. या मारामारीची फिर्याद सारिका सुनील खानावळे यांनी हातकणंगले पोलिसांत दिली आहे.
हातकणंगलेतील प्रभाग पाचमध्ये गटारीचे बांधकाम सुरू आहे. ही गटर तेथील रहिवासी खानावळे यांच्या खासगी जागेतून जाते. त्यामुळे पाणी जाण्यास अडथळा होत होता. याबाबत त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली होती. त्यांची परवानगी न घेता काम सुरू केल्याने त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना नोटीसही बजावली आहे. त्यानंतरही चर्चेतून मार्ग काढण्यास खानावळे तयार होते. त्यासाठी त्यांनी माजी उपसभापती दीपक वाडकर, माजी ग्रा. पं. सदस्य सुभाष चव्हाण, धोंडिराम कोरवी यांना पंच म्हणून बोलावले. मात्र, या चर्चेदरम्यान रणजित धनगर व दीपक वाडकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. प्रकरण थेट हाणामारीपर्यंत जाऊन रणजित धनगर हे थेट दीपक वाडकरांच्या अंगावर धावून गेले. यावेळी उपस्थितांकडून अर्वाच्य शिवीगाळही करण्यात आली. नगराध्यक्ष अरुण जानवेकर व इतरांनी मध्यस्थी करत सर्वांना बाजूला केल्याने पुढील अनर्थ टळला.