कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुद्गार काढल्यामुळे महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाव्दारे केली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडे आज, सोमवारी सायंकाळी हे निवेदन देण्यात आले. त्यांनी भावना शासनाला कळवण्याचे आश्वासन दिले. तत्पूर्वी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमले. या ठिकाणी आंबेडकर यांचा जयघोष करत पाटील यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.यानंतर सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, पाटील यांच्या वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण झाला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, जर तुम्ही गुन्हा दाखल केला केला नाही तर प्रशासनाविरोधात तक्रार करून उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणामध्ये पत्रकारांवर गुन्हा दाखल होता कामा नये. तौफिक मुल्लाणी म्हणाले, याआधी कोणी काही बोलले तर सायबर सेल अॅक्टिव का केला नाही.