कोल्हापूर : आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲड. पंडितराव सडोलीकर यांना उपचाराकरिता दाखल न करुन घेणाऱ्या रुग्णालयावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांची मान्यता काढून घ्यावी, सीपीआर रुग्णालय कोरोनामुक्त करावा आदी मागणीसाठी सोमवारी आरपीआयच्या आठवले गटातर्फे सीपीआर रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली. निदर्शनानंतर या मागणचीचे निवेदन सीपीआरचे डीन यांच्यासह जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले.कोरोना संसर्गाच्या काळात कोरोना व्यतिरीक्त अन्य कोणाही सर्वसामान्य रुग्णांवर उपचाराची सुविधा मिळणे आवश्यक आहे.तसेच तो रुग्णांचा अधिकार आणि डॉक्टर किंवा रुग्णालयांचे कर्तव्य देखिल आहे. मात्र कोल्हापुरातील नामांकित वकील व आरपीआर पक्षाचे राज्य सचिव पंडीतराव सडोलिकर यांना दि. ३ ऑगस्टच्या मध्यरात्री ह्रदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यास शहरातील आठ रुग्णालयांनी नकार दिला.
सडोलिकर यांच्या मुलाने त्यांना रुग्णालयांना विनंती करुनही त्यांना निरनिराळी कारणे सांगून उपचारास दाखल करुन घेण्यास नकार दिला. अत्यवस्थ रुग्णावर औषधोपचार न करता त्यांना परत पाठविण्याचे कृत्य निष्काळजीपणाचे व बेजबाबदारपणाचे आहे. उपचार न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही निंदनीय घटना आहे. म्हणूनच संबंधित खासगी रुग्णालयावर तसेच डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.सीपीआर समोर सोमवारी झालेल्या निदर्शनात दत्ता मिसाळ, सतीश माळगे, सचिन आडसुळे श्रीकांत मालेकर, तानाजी मिसाळ, उमेश माने, सचिन पाटील, नितीन कांबळे, साताप्पा चाफोडीकर, डॉ. दामुगडे प्रविण निगवेकर, सलमान मौलवी यांनी भाग घेतला.