लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन केलेली असते. या समितीची दर तीन महिन्यांनी बैठक घेणे बंधनकारक आहे. मात्र कोल्हापूर परिक्षेत्रातील या समितीची गेल्या वर्षभरात एकही बैठक झालेली नाही, अशी माहिती भाजपच्या महिला मोर्चाने उघडकीस आणली आहे. ही बैठक घ्यावी, यासह दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येबाबत शिवकुमार याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्य वनसंरक्षक व्ही. सी. बेन यांची भेट घेऊन त्यांना या मागण्यांचे निवेदन दिले आणि चर्चा केली. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत म्हणाल्या, वन विभागामध्ये काम करणाऱ्या दीपाली चव्हाण या अधिकारी महिलेने शिवकुमार याच्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी केलेल्या तक्रारीकडे वरिष्ठांनी कानाडोळा केल्यामुळे दीपाली चव्हाण यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला. आरोपी शिवकुमारला तुरुंगामध्ये पंखा, बरमुडा, मटण तसेच अन्य चैनीच्या वस्तू देण्यामध्ये कोणाकोणाचे हितसंबध गुंतले आहेत, याची माहितीही महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे.
अशा पद्धतीची महिला तक्रार समितीची बैठक गेल्या वर्षभरात झालेली नाही, हे बेन यांनी यावेळी कबूल केले. दर तीन महिन्यांनी अशी बैठक घेण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आसावरी जुगदार, विद्या बनछोडे, स्वाती कदम, शुभांगी चितारे, कविता लाड, अरुणा घाडगे, कोमल देसाई उपस्थित होत्या.
०१०४२०२१ कोल बीजेपी
भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने अध्यक्षा गायत्री राऊत व अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्य वनसंरक्षक व्ही. सी. बेन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.