लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ऊस तोडणीसाठी मजुरांचा पुरवठा करतो, म्हणून ऊस वाहतूकदारांकडून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली.
कोल्हापूर जिल्ह्य हा साखरपट्टा म्हणून ओळख आहे. जिल्हात ऊसपीक मोठ्या प्रमाणावर घेतल जाते. स्थानिक ऊसतोड मजुरांची कमतरता असल्याने मराठवाडा, सोलापूर आदी भागातून येथे मजूर येतात. ऊस वाहतूकदार संबंधित मजुरांना मुकादमाच्या माध्यमातून आणतात. चार महिने अगोदर ॲडव्हास दिली जाते. मात्र, हंगाम सुरू झाल्यानंतर त्यातील अनेक कामगार येत नाहीत. मुकादमही वाहतूकदारांची गाठ घेत नसल्याने त्यांची फसवणूक होते. ऊस वाहतूकही नाही आणि दिलेले ॲडव्हासचे पैसेही मिळत नसल्याने लाखो रुपयांचा फटका बसतो. गेली पाच-सहा वर्षांपासून फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली असून वाहतूकदार अडचणीत सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांच्या शिष्टमंडळाने आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी यापुढच्या काळात फसवणूक केलेल्या मुकादम यांच्या विरोधात वाहतूकदारांनी तक्रारी द्याव्यात पोलीस प्रशासन संबंधितांवर गुन्हे दाखल करून घेईल, अशी ग्वाही दिली. यावेळी एस. वाय. किल्लेदार, मारुती पाटील, अविनाश पाटील, दिगंबर पाटील, अनिल माने, युवराज पाटील, अमित पाटील, बाबासाहेब गोते, नितीन सूर्यवंशी उपस्थित होते.
फोटो ओळी : फसवणूक करणाऱ्या ऊसतोडणी मुकादमांवर गुन्हे दाखल करा, या मागणीचे निवेदन आमदार ऋतुराज पाटील यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिले. (फोटो-२६०२२०२१-कोल-शुगर)