कोल्हापूर : महानगरपालिकेची मंजुरी नसताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आमिष दाखविण्यासाठी रस्ते केले जात आहेत. गंगावेश, पापाची तिकटी, डोर्ले कॉर्नर या ठिकाणी वर्कऑर्डर, निविदेशिवाय कामे सुरू आहेत. शहरात इतर ठिकाणीही असाच प्रकार आहे. तरी अशा कामांची बिले काढू नयेत. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले. सोमवारी महापालिकेच्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
क्षीरसागर म्हणाले, युनिफाईड प्रणालीचा निर्णय झाला असून याची दहा दिवसांच्या आत अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. बांधकाम परवानगीसाठी गोरगरीब सामान्यांचे हाल होत असून प्रलंबित बांधकाम परवाने हे एक खिडकी योजनेतून शिबिर लावून मार्गी लावावेत. थेट पाईपलाईनमध्ये न केलेल्या कामाचे पैसे दिल्याचे समजते, याबाबत गांभीर्याने विचार व्हावा.१५३३ गुंठे जागेचा टीडीआर घोटाळ्याचे प्रकरण चर्चेत आहे. संबंधितांवर कारवाई करा. तसेच केएमटी निवृत्त कर्मचाऱ्यांना ज्येष्ठता यादीप्रमाणे रक्कम द्यावी.
यावेळी रविकिरण इंगवले, राहुल चव्हाण, नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित होते.
चौकट
हद्दवाढ झाल्यास तेवढ्या भागाची निवडणूक
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हद्दवाढीसाठी सकारात्मक असून तातडीने फेरप्रस्ताव पाठविण्यात यावा, असे क्षीरसागर यांनी सांगितले. यावर निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे हद्दवाढीचा प्रस्ताव पाठविण्यास तांत्रिक अडचणी आहेत. क्षीरसागर यांनी निवडणुकीनंतर प्रस्ताव पाठविल्यानंतर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल, असा मुद्दा उपस्थित केला. प्रशासनाकडून असे होणार नसून जेवढा परिसर हद्दवाडीत समाविष्ट होणार, त्याची निवडणूक लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप नगरसेवकांच्या प्रभागातच ‘अमृत’ची पाईपलाईन
अमृत योजनेचा निधी मंजूर झाला. त्यातून कामेही सुरू झाली. परंतु, शहरात समप्रमाणात निधीचे वाटप केलेले नाही. भाजपच्या नगरसेवकाच्या प्रभागातच झुकते माप दिल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला. शहरात इतर ठिकाणच्या कामासाठी प्रस्ताव करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.
फोटो : ११०१२०२० कोल शिवसेना बैठक
ओळी : कोल्हापुरात सोमवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेमध्ये विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, रविकिरण इंगवले, राहुल चव्हाण, ऋतुराज क्षीरसागर, नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते. (नसिर अत्तार)