कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील साक्षीदारांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद कॉ. दिलीप पवार यांनी दिली होती. त्यानुसार हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अॅड. पुनाळेकर यांचे पत्र व कॉ. पवार यांचा तक्रार अर्ज हा न्यायालयास सादर करणार असल्याची माहिती शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील साक्षीदारांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन दि. १५ जानेवारी रोजी कॉ. दिलीप पवार यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना दिले होते. त्यावर देशपांडे यांनी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अॅड. संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक चौधरी यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी अदखलपात्र गुन्ह्याचा तपास होत नाही. अॅड. संजीव पुनाळेकर यांचे पत्र व तक्रारदार कॉ. पवार यांचा तक्रार अर्ज न्यायालयास सादर केला जाणार आहे. यावर न्यायालय पुढील निर्णय घेईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)
पुनाळेकरांच्या विरोधातील तक्रार अर्ज न्यायालयात दाखल करणार
By admin | Published: January 17, 2016 12:29 AM