कोल्हापूर : सतरा कोटी रुपये खर्च करून विभागीय क्रीडासंकुलाचे काम अद्यापही रखडले आहे. झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. संबंधित अधिकारी, ठेकेदार व देखरेख करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष सुहास साळोखे यांनी निवेदनाद्वारे केली.संभाजीनगर येथील रेसकोर्स परिसरात २००४ साली तत्कालीन शासनाने पाच जिल्ह्यांसाठी विभागीय क्रीडासंकुलासाठी २४ कोटींचा निधी मंजूर केला. त्यानुसार २००९ साली कामास सुरुवात झाली. त्यानंतर मजल-दरमजल करीत हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. यावर १७ कोटी ४० लाख ५३ हजार १४७ इतका खर्च झालेला आहे. झालेले कामही निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची शंका आहे.
या कामाचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत आॅडिट करून संबंधित अधिकारी, बांधकाम ठेकेदार, देखरेख करणारी कंपनी, आदींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पुणे येथील बालेवाडी क्रीडाग्राम येथील कार्यालयात सहसंचालक मोरे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.