कोल्हापूर : खासगी फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून दोन महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. या कंपन्या बेकायदेशीर असून, कंपनीचे मालक व व्यवस्थापकांना जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बहुजन परिवर्तन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली. निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्रामध्ये या बेकायदेशीर कंपन्या विरोधात मोर्चे निघत आहेत. या खासगी सावकरांच्या त्रासाला कंटाळून दोन महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. ही बाब गांभीर्याने सरकारने घेतली नाही. यापुढेही ‘वसुली’च्या नावावर आणखी किती जीव या फायनान्स कंपन्या घेतील. त्यामुळे सरकारने वेळीच लक्ष घालून या कंपन्यांविरोधात कारवाई करावी. कंपनीचे मालक व व्यवस्थापकांवर सरकारने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून जनतेला न्याय द्यावा. कारवाई करून कंपन्यांना कोल्हापुरातून हद्दपार करावे. त्वरित न्याय न दिल्यास जोपर्यंत या कंपन्यांविरोधात कारवाई होत नाही. तोपर्यंत संघटनेच्यावतीने आमरण उपोषण करू, असा इशारा देण्यात आला. तत्पूर्वी मोर्चा टाऊन हॉलमार्गे, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय असा काढला. या मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. महिला बचाव समितीच्या राज्य अध्यक्षा मनिषा नाईक, जिल्हा अध्यक्षा शोभाताई नलवडे, गीता जेधे, बहुजन परिवर्तन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव नाईक, राजू सांगेला, दादा जगताप, अश्विनी कुरणे, आक्काताई पांढरे, छाया साठे यांच्यासह आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांसह हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. बंदोबस्त न दिल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको मोर्चा व्हीनस कॉर्नर चौकात आला असता आंदोलकांनी मोर्चासाठी योग्य बंदोबस्त न दिल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. पोलिसांनी वाहतुकीला अडथळा येईल असे कोणतेही कृत्य करू नका म्हणून विनंती केली. मात्र, आंदोलक आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. त्यातून पोलिसांनी रास्ता रोको केलेल्या महिला व पुरुषांना उठविण्याचा प्रयत्न केला. त्यात आंदोलक व पोलिसांच्यात बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करण्याचा इशारा देताच मोर्चा सुरळीत नेण्याचे आश्वासन आंदोलकांनी दिले. तासानंतर पुन्हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. दरम्यान, स्टेशन रोड परिसरात वाहनांचा रांगाच रांगा लागल्या होत्या तर सर्व चौकच अडविल्याने चोहोबाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन परिवर्तन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीतर्फे सोमवारी खासगी फायनान्स कंपन्यांवर शासनाने गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
फायनान्स कंपन्यांवर गुन्हे दाखल करा
By admin | Published: January 24, 2017 12:53 AM