कोल्हापूर : महापालिकेच्या जेम्सस्टोन इमारतीतील पार्किंग जागेवर तसेच दुकानगाळ्यांवर ६५ कोटींचे कर्ज काढणाऱ्या ठेकेदारावर अद्याप फौजदारी गुन्हा का दाखल केलेली नाही, अशी विचारणा करत स्थायी समिती सभेत सदस्यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांवर शाब्दिक हल्लाबोल केला. संबंधित ठेकेदाराकडून घरफाळ्यासह अन्य थकबाकीही तत्काळ वसूल करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सभापती संदीप कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. सभेतील चर्चेत जेम्सस्टोन इमारतीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. भूपाल शेटे यांनी हा मुद्दा उपस्थित करून अधिकाºयांना झोडपून काढले.
विचारे विद्यालय पाडून त्या ठिकाणी जेम्सस्टोन इमारत बांधण्याचा ठेका मुंबईच्या भारत उद्योग समूहाला देण्यात आला होता. ठेकेदारांपैकी सूर्यकांत राजाराम कुकरेजा, श्रीचंद राजाराम कुकरेजा व व्यवस्थापक रितेश राज प्रसाद या तिघांनी मिळून इमारतीमधील पार्किंगच्या जागेवर तसेच तेथील १५ गाळ्यांवर मिळून ६५ कोटींचे कर्ज काढले असून, त्याला महापालिकेच्या तत्कालीन अधिकाºयांनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ही दिले होते. ही महापालिकेची फसवणूक असून, ठेकेदारावर अद्याप गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा शेटे यांनी केली.
ठेकेदाराने स्वत:कडे १५ दुकानगाळे राखून ठेवले असून, त्याचा २५ लाख रुपयांचा घरफाळा थकला आहे, त्यामुळे ही वसुली का केली नाही? थकबाकीपोटी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा सवालही शेटे यांनी विचारला. आयुक्तांसोबत झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार संबंधित ठेकेदाराने जागा हस्तांतरणाचे पाच टक्क्यांप्रमाणे सुमारे दोन कोटी रुपये हस्तांतरण शुल्क भरायचे होते, तेही भरलेले नाही. तेही का वसूल केले नाही, याबद्दलचा जाबसुद्धा शेटे यांनी विचारला. तेव्हा अधिकारी निरुत्तर झाले. सभापती संदीप कवाळे यांनी याप्रकरणी तातडीने ठेकेदारावर कारवाई कररुन वसुलीचे आदेश दिले.
वृक्षगणनेतही घोटाळा?शहरातील वृक्षगणनेत घोटाळा झाल्याचा आरोप सभेत भूपाल शेटे यांनी केला. त्यानंतर वृक्ष प्राधिकरण समिती, हेरिटेज समिती, किरणोत्सव समितीच्या कामकाजाचा या सभेत पर्दाफाश करण्यात आला. या विषयावरून शारंगधर देशमुख, सत्यजित कदम यांनी प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली.शहरातील पाच लाख ६२ हजार ९४५ वृक्षांची गणना करून ५६ लाख ४४ हजार ३९७ रुपये मिळविल्याचा त्यांनी आरोप केला. ही वृक्षगणना कार्यालयात बसून केली असून, त्यात महापालिकेचे अधिकारी तसेच वृक्ष प्राधिकरण समितीवरील सदस्यांनीही ठेकेदारास मदत होईल, अशीच भूमिका बजावल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला.
गायकवाड यांना काढून टाकण्याचा ठरावमहापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण, हेरिटेज व किरणोत्सव अशा तीन समित्यांवर सदस्य असलेल्या पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते उदय गायकवाड यांना काढून टाकण्याचा ठराव सभेत करण्यात आला. आयुक्तांनी गायकवाड यांचे खूप लाड केले.अधिकार नसताना ते पालिकेचे दप्तर घरी घेऊन जातात. वृक्षतोडीची परवानगी कोणी मागितली तर त्यांना येर-झाऱ्या मारायला लावतात, असा आरोप शारंगधर देशमुख यांनी सभेत केला. त्यांना तिन्ही समित्यांवर काढून टाकण्याचा ठराव देशमुख यांनी दिला. तो मंजूर करण्यात आला.