कोल्हापूर : वादग्रस्त न्यूटन एंटरप्राईजेस या बोगस कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी झाल्याचे सिध्द झाले आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करुन संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या त्याचबरोबर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना असतानाही अद्याप संबंधित ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याचे कारण स्पष्ट करावे, अन्यथा न्यायालयात खेचावे लागेल असा इशारा मंगळवारी शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सीपीआरच्या अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना दिला. सीपीआरमध्ये शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी मंगळवारी सीपीआरच्या अधिष्ठातांची भेट घेतली.न्यूटन इंटरप्राईजेस कंपनीचा परवाना बनावट असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने लेखी स्वरुपाच्या सूचना दिल्या, तरी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्यांच्या साखळीमुळे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित ठेकेदाराला काम देऊ नये असा अभिप्राय दिला असतानाही कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी केली. शिवसेनेने या विषयावर हल्लाबोल केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करुन संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या, त्याचबरोबर गुन्हा दाखल करण्याच्याही सूचना असताना अद्यापपर्यंत संबंधित ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल शिवसेनेने केला.दहा कोटी रुपयांची गरजेनुसार खरेदी न करता अनावश्यक, मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळते म्हणून नाविन्यपूर्ण योजनेतून खरेदी करणाऱ्या प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व त्यांना साथ देणाऱ्या यंत्रणेचा बुरखा फाडून कोल्हापुरातील संबंधित खात्याचे मंत्री पालकमंत्री हसन मुश्रीफ बंदोबस्त करावा अशी मागणी या पक्षाने केली आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, विजय देवणे, विशाल देवकुळे, दिनेश साळोखे, विराज ओतारी, महादेव कुकडे, सूरज कांबळे, संजय जाधव, हर्षल पाटील, अभिजीत बुकशेठ, प्रवीण पालव, माधुरी जाधव, सुनील कानूरकर उपस्थित होते.
Kolhapur: ‘न्यूटन’च्या ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अन्यथा..; शिवसेनेचा इशारा
By संदीप आडनाईक | Published: March 19, 2024 3:34 PM