कोल्हापूर : ऊसतोडीसाठी मजुरांचा पुरवठा करतो असे सांगून ऊस वाहतूकदार मालकांची दरवर्षी लाखोंची फसवणूक करणाऱ्या मराठवाडा व विदर्भातील मुकादमांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे गुरुवारी केली. बलकवडे यांनीदेखील हे गंभीर असून पोलीस सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी ग्वाही दिली.
ऊसतोडीसाठी मजुरांचा पुरवठा करतो असे सांगून मराठवाड्यातील मुकादम कारखान्याकडून लाखो रुपये घेतात; परंतु टोळी मुकादम लाखो रुपयांचा ॲडव्हान्स घेऊन प्रत्यक्षात टोळी न पाठविता फरार होतात. टोळी मिळावी याकरिता संबंधित वाहतूकदार मुकादमांचा शोध घेण्याकरिता गेले असता ऊस वाहतूकदारांना मारहाण करणे, अपहरणाचे खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार होतात. पोलीस गुन्हे दाखल करून घेत नाहीत, अशी तक्रारही आबिटकर यांनी मांडली.
यावेळी ऊस वाहतूकदार संघटनेचे सदाशिव चव्हाण, विक्रम पाटील, वसंत प्रभावळे, अनिल हळदकर, कृष्णात राजिगरे, रघुनाथ सारंग, सुभाष पाटील, जयवंत मोरे, कृष्णात वैराट, तानाजी कदम, संजय घरपणकर, युवराज सुतार, सरंपच धनाजी खोत, सर्जेराव पाटील यांच्यासह राधानगरी-भुदरगड तालुक्यांतील ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
फसवणूक झालेल्या वाहतूकदारांचे टोळी मुकादमांशी झालेले करार व नोटरी पत्रे कोल्हापूर जिल्ह्यात झाली आहेत व त्यांचे पैसे ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून पाठविले आहेत, अशा तक्रारी घेऊन पहिल्या टप्प्यात या कागदपत्रांच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करू.
- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक
फोटो : १०१२२०२०-कोल-आबीटकर
फोटो ओळ : कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांची तोडणी टोळी मुकादमांकडून होत असलेल्या फसवणुकीबद्दल आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली वाहतूकदारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पाेलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन चर्चा केली.