कोल्हापूर : रायनपाडा (ता. साकी, जि. धुळे) येथे झालेल्या निरपराध डवरी समाजाच्या हत्याकांडप्रकरणी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.दुपारी साडेबाराच्या सुमारास आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकासमोर निदर्शने करीत ठिय्या मारला. या ठिकाणी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करीत आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनातील मागण्या अशा, ग्रामपंचायत इमारतीमध्ये निरपराध लोकांचे हत्याकांड झाले असून, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायतच बरखास्त करावी. हत्याकांडातील बळी पडलेल्या कुटुंबांचे तत्काळ पुनर्वसन करावे व प्रत्येक कुटुंबाला २५ लाख रुपये मदत द्यावी. तसेच प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घ्यावे.
दारोदारी फिरून परंपरागत व्यवसाय करणाऱ्या या समुदायास संरक्षण मिळावे, विनाकारण संशयाने त्यांचा छळ होणार नाही, याची शासनाने खबरदारी घ्यावी. या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. या निवेदनाची प्रत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, मुख्यमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांना पाठवावी, अशी विनंती करण्यात आली.आंदोलनात संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ शिंदे, कालिदास शिंदे, शंकर बाबर, बानू इंगवले, विकास बुरुंगले, यशवंत इंगवले, शिवाजी भोसले, दादा शिंदे, दिनकर भोसले, आदी सहभागी झाले होते.