कोल्हापूर : अलमट्टी धरणातील चुकीच्या विसर्गपद्धतीविरोधात व धरणाच्या उंचीविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, तसेच हरित लवादापुढे रेडझोनच्या संदर्भातील सुनावणीवेळी या गोष्टी प्रामुख्याने मांडाव्यात, असा ठराव महानगरपालिका सभेत करण्यात आला.प्रा. जयंत पाटील, सचिन पाटील यांनी मांडलेल्या या ठरावास शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव यांनी अनुमोदन दिले आहे. या ठरावावर बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, १५ जुलै ते १५ आॅगस्ट या काळात प्रचंड पाऊस झाल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील धरणे ३० जुलैपर्यंत पूर्णपणे भरली.
या धरणातील विशेषत: कोयना, धोम, वारणा, राधानगरी, काळम्मावाडी धरणातील प्रचंड विसर्ग वारणा, कोयना, पंचगंगा व कृष्णा नद्यांना महापूर आला. कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातून विसर्ग हा या नद्यांमध्ये मिसळणाऱ्या पाण्यापेक्षा कमी होता; त्यामुळे कृष्णा नदीला पर्यायाने पंचगंगा नदीला महापूर येऊन जिल्ह्यात सुमारे दोन हजार कोटींचे, तर शहरात २00 कोटींचे नुकसान झाले.सर्व नुकसान अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढविल्याने नृसिंहवाडीच्या पाणी पातळीच्या १४ मीटरने जास्त आहे. अलमट्टी धरणाच्या वाढीव बांधकामामुळे व अशास्त्रीय विसर्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यात असामान्य अशी पूरस्थिती निर्माण झाली. त्याचा फटका कोल्हापूर शहरातील ४0 टक्के भागाला बसला.
म्हणूनच अलमट्टीच्या चुकीच्या विसर्ग पद्धतीच्या, तसेच धरणाची उंची वाढविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, तसेच हरित लवादासमोरील सुनावणीवेळी या बाबी मांडाव्यात, असे प्रा. पाटील म्हणाले.दरम्यान, सहायक नगररचना संचालक प्रसाद गायकवाड यांनी खुलासा करताना यासंदर्भात एक याचिका दाखल झाली असल्याने याबाबत विधित्ज्ञांचा सल्ला घेण्यात येईल, असे सांगितले.