कोपार्डे : बालिंगा (ता. करवीर) येथील सराफ व्यावसायिक सतीश ऊर्फ संदीप पोवाळकर (सध्या रा. कणेरकरनगर) याच्या विरोधात शनिवारी करवीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्याने दोन कोटी नऊ लाख ४० हजार ४२९ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. पोवाळकरबरोबर त्याचा मेहुणा अमोल पवार (रा. सातार्डे, ता. पन्हाळा) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचा दोनवडे (ता. करवीर) येथील सतीश पोवाळकर बालिंगा येथे गेली दहा वर्षे सराफ व्यवसाय करत होता. आंबिका ज्वेलर्स नावाने त्याचे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर ज्वेलरीचे दुकान आहे. तो सोनेतारण कर्ज देत होता. याशिवाय त्याच्याकडे अनेक लोकांनी पिग्मी व सुवर्णठेव नावाने ठेवी संकलित केल्या होत्या. यासाठी त्याने पिग्मी एजंट नेमले होते.
गेली आठ दिवस तो आपल्या कुटुंबासह बेपत्ता असल्याची कुणकुण लागताच गुरुवारी गुंतवणूकदारांनी त्याच्या दुकानासमोर ठिय्या मारला होता. त्याच्या कणेरकरनगर व दोनवडे येथील घरी चौकशी केली, पण तो आठ दिवसांपासून घरातून निघून गेल्याचे समजताच गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. फसवणूक झालेल्या मुकुंद बोडके, विनायक चंद्रकांत गुरव, भाग्यश्री आयरेकर, नितीन माळी, अमित कानकेकर, (बालिंगा), राजेंद्र चिवटे, सर्जेराव पाटील (दोनवडे), अमर डेंगे, दत्ता ढेरे, प्रियांका ढेंगे (नागदेववाडी) यांच्यासह ५० ते ६० फसवणूक झालेल्या नागरिकांनी शनिवारी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
आरोपी : १७ संतोष ऊर्फ संदीप पोवाळकर