कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीला मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाचा पर्याय दिला आहे. यासंदर्भात विकासाच्या संकल्पना काय असाव्यात, यासाठी लेखी सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी उचगाव, पाचगाव, उजळाईवाडी व वडणगे येथील चार लेखी सूचना सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीचे प्रवक्ते नाथाजीराव पोवार यांच्याकडे सोमवारी दाखल झाल्या.रविवारी ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथे प्राधिकरणासंदर्भात सूचना मागविण्यासाठी सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीतर्फे १८ गावांतील प्रतिनिधींच्या बैठक घेऊन लेखी सूचना देण्यासंदर्भात आवाहन केले होेते. या सूचना आज, मंगळवारपर्यंत द्याव्यात, त्या एकत्रित करून गुरुवारी (दि. २७) जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी चार सूचना दाखल झाल्या. त्यामध्ये उजळाईवाडी येथील कृष्णराव चव्हाण यांनी देवराई हायस्कूल परिसरात विद्यार्थ्यांसाठी भव्य मैदान उभारावे तसेच या परिसराचा विकास करावा, असे म्हटले आहे.पाचगावचे माजी उपसरपंच चंद्रकांत कांडेकरी यांनी दिलेल्या सूचनेमध्ये या ठिकाणी मुबलक पाण्यासाठी पाण्याची टाकी, बगिचा, महिलांसाठी मॉल असावा, त्याचबरोबर लोकांच्या विकासासाठी नवीन संकल्पना राबवाव्यात, असे म्हटले आहे.वडणगेचे माजी उपसरपंच सचिन चौगुले यांनी गावातील तलावाचे सुशोभिकरण करावे, या तलावात पंचगंगा नदीतील पाणी आणण्यासाठी नदीवर पंप बसविण्यात यावा, पार्वती देवस्थानचे पर्यटनस्थळ करावे, शिये-भुये मार्गावर दवाखाना, थिएटर, शाळा, मैदान, टेबल टेनिस कोर्ट अशा पद्धतीने विकास व्हावा, अशी सूचना केली आहे. (प्रतिनिधी)शेतीवर आरक्षण नकोउचगाव सरपंच सुरेखा चौगले यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने सूचना सादर केल्या. त्यामध्ये म्हटले आहे की, यापूर्वी गावची ८०० एकर जमीन विविध विकास प्रकल्पांसाठी गेली आहे. आता उरलेली शेती ही लोकांच्या उदरनिर्वाहासाठी आहे. त्यामुळे या शेतीवर कोणतेही आरक्षण न टाकता ती तशीच राहावी.
प्राधिकरणासंदर्भात सूचना दाखल
By admin | Published: October 25, 2016 12:07 AM