सांगली : महापालिका हद्दीतील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी मुख्य रस्त्यांच्या २४ कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच मान्यता दिली आहे. आता स्थायी समितीच्या दरमान्यतेनंतर महिन्याभरात रस्त्यांच्या कामाला सुरूवात होईल. महापौर हारूण शिकलगार यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांतील मुख्य रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक रस्ते खड्ड्यात गेल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. महापौर हारूण शिकलगार यांनी मुख्य रस्ते सुधारण्यासाठी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्हा नियोजन समितीतून ७ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली. त्यानुसार महापालिकेने दहा कोटीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. दरम्यान, काही नगरसेवकांनी या यादीत आणखी रस्त्यांचा समावेश करण्याची मागणी केली. त्यानुसार महासभेत चर्चा होऊन महापालिकेने तीनही शहरांतील ३५ मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचा २४ कोटीचा प्रस्ताव तयार केला. नियोजन समितीतून निधी न मिळाल्यास महापालिकेच्या निधीतून रस्ते करण्याचा ठरावही महासभेत करण्यात आला. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. दोनच दिवसांपूर्वी या निविदांना आयुक्तांनी मान्यता दिली. त्यामुळे २४ कोटीच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. बांधकाम विभागाकडून दरमान्यतेसाठी ही सर्व कामे स्थायी समितीकडे पाठविली जातील. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर ठेकेदाराला समन्स, वर्कआॅर्डर देऊन तातडीने काम सुरू करण्यात येईल, असे महापौर शिकलगार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
चोवीस कोटींच्या रस्त्यांचा मार्ग मोकळा
By admin | Published: April 14, 2017 12:13 AM