लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने सरस्वती टॉकीज येथे बहुमजली पार्किंगसाठी करण्यात येत असलेल्या खुदाई दरम्यान सापडलेला हंडा खंबाळा तलावाच्या भरावात टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तलावाच्या बाबूजमाल दर्गाच्या बाजूला व रस्त्याच्या बाजूला पायऱ्या दिसल्या आहेत. आता २३ फुटांपर्यंत खुदाई झाली असून आणखी काही सापडते का यावर आम्ही लक्ष ठेवून असल्याने महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. पुरातत्व विभागाकडूनदेखील याची पाहणी करण्यात आली आहे.
अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत महापालिकेच्यावतीने सरस्वती टॉकीज येथे बहुमजली पार्किंग उभारण्यात येत असून त्याअंतर्गत खुदाई करताना खंबाळा तलावाच्या पायऱ्या दिसल्या आहेत शिवाय भरावात टाकण्यात आलेली मातीची घागर सापडली आहे. कोल्हापूर एकेकाळी तळ्यांचे शहर होते पण वापरासाठी भूखंड हवा, एवढ्या तळ्यांची गरज नाही, या कारणात्सव त्या मुजवण्यात आल्या. आम्ही खुदाईला सुरुवात केली त्यावेळी जुन्या-जाणत्या नागरिकांनी तुम्हाला येथे पायऱ्या सापडतील, असे सांगितले होते. त्यानुसार आता खुदाई दरम्यान खंबाळा तलावाच्या खुणा सापडल्या आहेत. पाया लागेपर्यंत खुदाई करण्यात येणार असून त्या दरम्यान काही सापडते का, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. आता पायऱ्यांचे काय करायेच याचा निर्णय महापालिका व आर्किटेक्ट घेतील, असे कॉन्ट्रॅक्टर वसंतराव पाटील यांनी सांगितले.
--