कोल्हापूर : अकरावीच्या ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरण्याची मुदत नियोजित वेळापत्रकानुसार बुधवारी संपली. ज्या विद्यार्थ्यांनी हा भाग भरला आहे, त्यांनी पुढील प्रक्रियेअंतर्गत अर्जाचा दुसरा भाग उद्या, शुक्रवारपासून भरावयचा आहे.
कोल्हापूर शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया दि. ७ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. प्रवेश समितीने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरण्याची मुदत बुधवारपर्यंत होती. त्यात विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्वरूपातील नोंदणी करावयाची होती.
आता अर्जातील दुसरा भाग उद्या, शुक्रवारपासून भरावयाचा आहे. त्यामध्ये दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण, महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरायचे असून गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आदी कागदपत्रे अपलोड करायची आहेत. या प्रक्रियेसाठी दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. त्यानंतर दि. २४ ऑगस्टपासून निवड यादी तयार करण्याची प्रक्रिया होणार आहे.गेल्या सहा दिवसांत नोंदणी केलेले विद्यार्थी
- ७ ऑगस्ट : ३०३२
- ८ ऑगस्ट : ३७२२
- ९ ऑगस्ट : १८५९
- १० ऑगस्ट : १६१८
- ११ ऑगस्ट : १४७६
- १२ ऑगस्ट (सायंकाळी पाचपर्यंत) : १०४२
- एकूण : १२७४९
शासकीय तंत्रनिकेतनकडे ऑनलाईन अर्जशासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनची (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची आणि कागदपत्रांची छाननी करण्याची मुदत दि. २५ ऑगस्टपर्यंत आहे. शासकीय तंत्रनिकेतनकडे बुधवारपर्यंत छाननीच्या प्रक्रियेसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ५० अर्ज प्राप्त झाले आहेत. दहावीची गुणपत्रिका मिळाली नसल्याने प्रक्रियेची गती काहीशी कमी आहे.