कोल्हापूर : जिल्ह्यातील मूकबधिरांच्या अनुशेष भरतीमध्ये ‘समान संधी, समान हक्क’ या तत्त्वावर सरळसेवेत रिक्त पदे भरावीत, यासह विविध मागण्यांसाठी मूक-कर्णबधिर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.असोसिएशनचे अध्यक्ष अतुल फणसाळकर व सरचिटणीस अतुल भाळवणे यांच्या नेतृत्वाखाली मूकबधिरांनी हे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात शेकडो मूक- कर्णबधिर बांधव सहभागी झाले होते. दरम्यान, मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.निवेदनातील मागण्या अशा, शासन नोकरभरती करताना ४० ते ७५ टक्केप्रमाणे असणाऱ्या कर्णबधिर व्यक्तींना नोकरीत सामावून घेतले जाते. प्रत्यक्षात ज्यांना नोकरीची जादा गरज आहे, त्यांच्यावर अन्याय होतो; त्यामुळे ज्या कर्णबधिर उमेदवारांमध्ये मूक बधिरत्वाचे प्रमाण ७५ ते १०० टक्के आहे, त्यांनाच शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात यावे.
जिल्हा शासकीय रु ग्णालयात जिल्हा नियोजन समितीमार्फत ‘बेरा टेस्ट’ कर्णबधिरत्व तपासणी सामग्री त्वरित उपलब्ध करावी, तसेच खासगी रुग्णालयाकडून भरमसाट फीद्वारे होणारी लूट थांबवावी. बोगस कर्णबधिर व मूकबधिर (अपंग) प्रमाणपत्र देण्याचे प्रकार त्वरित थांबविण्यासंदर्भात संबंधितांना सूचना करावी.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या उत्पन्नाच्या तीन टक्के निधी दिव्यांग योजनेवर खर्च करून त्यांना त्वरित लाभ मिळवून द्यावा. शासकीय आदेशाप्रमाणे मूक व कर्णबधिरांना त्यांच्या आरक्षित कोट्यातून सर्व शासकीय कार्यालयात नोकऱ्याच्या आरक्षित जागा त्वरित भराव्यात.