तुरंबे : कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्गावर चंद्रे-माजगाव या दोन गावांच्यामध्ये असणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामासाठी केलेल्या रस्त्यावरील पुलाचा भराव संततधार पावसामुळे पहाटे तीनच्या सुमारास वाहून गेला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुरुवारी पहाटेपासूनच या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. सकाळी पुलाचा पूर्वेकडील भराव वाहून गेल्याचे लोकांच्या लक्षात आले.
कोल्हापूर ते गारगोटी या राज्य महामार्गाचे खडीकरण व रूंदीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या रस्त्यावरील चंद्रे येथील बाभूळकाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतात शाहूकालीन अरूंद पूल होता. तो वाहतुकीस अडथळा येत असल्याने जितेंद्र सिंग कंपनीने हे पूल बांधण्याचे काम घेतले होते. हा पूल पाडण्यापूर्वी वाहने ये-जा करण्यासाठी पुलाच्या उजव्या बाजूला ओढ्यावर मुरूमाचा कच्चा भरावा टाकून रस्ता तयार केला होता. गेल्या चार दिवसांपासून राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने या ओढ्याला प्रचंड पाणी आल्याने हा भराव आज पहाटे तीनच्या सुमारास वाहून गेला. या घटनेमुळे पुलाच्या खालील बाजूकडील शेतकऱ्यांच्या विहिरी व शेतीचे नुकसान झाले आहे. सध्या कोल्हापूरहून येणारी वाहतूक माजगाव तळाशी मार्ग बिद्री 'गारगोटी सुरू आहे. तर गारगोटीहून येणारी वाहतूक चंद्रे, बाचणी, कोल्हापूर अशी वाहतूक सुरू आहे.
चौकट
सतीश पाटील यांचे प्रसंगावधान! सावित्री पुलाची आठवण
येथे नदीचा पूल नसला तरी यामुळे सावित्री पुलाच्या दुर्घटनेची आठवण झाली. यापुलाशेजारी राहत असलेल्या सतीश महीपती पाटील यांना ही घटना पहाटे तीनच्या सुमारास घडल्याचे समजताच त्यानी गांभीर्य ओळखून रस्त्यावर थांबले. नंतर इतर लोकांच्या मदतीने मोठ मोठे दगड रस्त्यावर ठेवून रस्ता बंद केला आणि तत्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही बाजूचा रस्ता बंद केला. सतीश पाटील यांच्यामुळे संभावित दुर्घटना टळली. त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
कोट
याबाबत राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, हा रस्ता गारगोटी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असल्याने त्यांना हा रस्ता त्वरित दुरूस्त करून हा कोल्हापूर ते गारगोटी राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
१७ चंद्रे रस्ता
फोटो कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्गावर चंद्रे-माजगाव फाट्याशेजारील पुलाचा भराव वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली.