इंदुमती गणेशकोल्हापूर : मराठी सिनेसृष्टीची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपये पडून असताना कर्मचाऱ्यांवर मात्र गेले तीन महिने पगाराविना दिवस काढावे लागत आहेत. लाईट बिल थकले, तीन कार्यालयांचे भाडे दिलेले नाही, एवढेच काय स्टेशनरी, कुरिअर, आयकार्ड अशा दैनंदिन खर्चालाही धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने मनाई केल्याने महामंडळाचे कामकाज चालवायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. यांचे राजकारण होते, पण आमचा जीव जातो, अशीच येथील कर्मचाऱ्यांची भावना आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात कोल्हापुरातील संचालक व अध्यक्षांसह अन्य संचालक अशा दोन गटांमध्ये पडलेल्या ठिणगीमुळे सर्वसामान्य कर्मचारी, चित्रपट व्यावसायिक, सभासद, वयोवृद्ध कलावंत होरपळून निघत आहेत. दुर्दैवाने हा विषय ताणवत असलेल्या कोणत्याही संचालकाला या प्रश्नाशी काही घेणेदेणे नाही. त्यामुळेच कार्यकारिणीची मुदत संपून अडीच वर्षे होऊन गेली तरी निवडणुकीचे भिजत घोंगडे ठेवले गेले आहे.
एवढेच कमी होते की काय आठ महिन्यांपूर्वी चित्रपट महामंडळावर प्रशासक आले. सुरुवातीला धर्मादाय उपायुक्त कार्यालयातील निरीक्षक शेनॉय यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी ठराविक दैनंदिन व्यवहार व कर्मचारी पगारासाठी मुभा दिली होती. त्यांच्यानंतर निरीक्षक रागिणी खडके यांची नियुक्ती झाली. गेल्या तीन महिन्यांपासून मात्र कार्यालयाने महामंडळाचे सर्वच खर्च थांबवले आहेत. कर्मचारी तीन महिने बिनपगारी काम करत आहेत. सर्व कार्यालयांचे लाईट बिल, भाडे थकले आहे. दैनंदिन कामकाजासाठी लागणाऱ्या स्टेशनरीपासून ते कुरिअरपर्यंतच्या कामासाठी किरकोळ रक्कम खर्च करण्याचे सुद्धा अधिकार काढून घेतले आहेत. त्यामुळे महामंडळाचे कामकाज ठप्प झाले आहे.
- थकीत पगार : महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्ये मिळून १८ कर्मचारी आहेत. त्यांचा तीन महिन्यांचा एकूण ६ लाख ३९ हजार २८० रुपये इतका पगार थांबला आहे.
- भाडे : आौरंगाबाद, नागपूर व नाशिक या तीन कार्यालयांचे मिळून ५२ हजार ५०० रुपये भाडे थकीत.
- पेटी कॅश (दैनंदिन खर्च) : ३५ हजार रुपये थकीत.
- प्रोफेशनल टॅक्स : ६ हजार २२५.
- सर्व कार्यालयांचे मिळून लाईट बिल : ३० हजार रुपये.
- एकूण : ७ लाख ६३ हजार ०५.
वयोवृद्ध कलाकार वाऱ्यावरज्या वयोवृद्ध कलाकारांचे पेन्शनचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत, त्यांना खर्चासाठी चित्रपट महामंडळातर्फे दरमहा हजार रुपये दिले जातात. या ९५ कलाकारांचे मानधन थांबवले गेले आहे. तसेच ज्यांना औषधोपचाराची गरज आहे अशा कलाकारांना केले जाणारे अर्थसहाय्य गेले ६ महिने बंद आहे.
कर्मचारी वेठीला..पदाधिकाऱ्यांचे अंतर्गत वाद आणि त्यातच धर्मादाय कार्यालयाने घेतलेल्या या कडक धोरणामुळे विनाकारण कर्मचारी मात्र वेठीला धरले जात आहेत. मुळातच त्यांना पगार फार कमी दिला जातो. त्यातही तीन तीन महिने पगार नसल्याने त्यांना सणासुदीच्या तोंडावर घरखर्च चालवायचा कसा, हा प्रश्न पडला आहे.