संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचे युद्धकौशल्य मांडणाऱ्या ‘फत्तेशिकस्त’ या ऐतिहासिक मराठी सिनेमाचे चित्रीकरण पन्हाळगडावर सुरू आहे. देशातील पहिले सर्जिकल स्ट्राईक हे या सिनेमाचे मुख्य कथानक आहे.फर्जंद या गाजलेल्या ऐतिहासिक सिनेमातीलच बहुतेक कलाकार या सिनेमात आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हेच या नव्या सिनेमाचेही दिग्दर्शक असून, आलमंडस् क्रिएशन्सची निर्मिती आहे.या सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, निखिल राऊत, अनुप सोहोनी, हरिष दुधाढे, अनिकेत मोहन, विक्रम गायकवाड या कलाकारांनी या चित्रीकरणात भाग घेतला. या कलाकारांच्या मुक्कामाची व्यवस्था कोल्हापुरात करण्यात आली आहे.गेले पंधरा दिवस या सिनेमाचे पन्हाळगडावर चित्रीकरण सुरू आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासह चिन्मय मांडलेकर आणि इतर कलाकारांवरील अनेक दृश्यांचे चित्रीकरण येथे करण्यात आले. या सिनेमातही ‘फर्जंद’प्रमाणेच शिवरायांच्या विविध व्यक्तिमत्त्वाचे पैलू मांडण्यात येत आहेत. शिवरायांची परिसराची इत्यंभूत माहिती आणि शस्त्रांचा योग्य वापर यावर या सिनेमात भर देण्यात येत आहे, अशी माहिती दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दिली. ‘फर्जंद’प्रमाणेच ‘फत्तेशिकस्त’ याही सिनेमातून शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मांडण्यात येतील. पन्हाळगडावर चित्रीकरण करताना चित्रतपस्वी भालजींच्या आठवणी आमच्यासोबत आहेत.
शिवरायांवरील सिनेमाचे पन्हाळ्यावर चित्रीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 12:43 AM