कोल्हापूर : अस्सल मराठी नाव असलेल्या कल्पक दिग्दर्शक आणि कवी नागराज मंजुळे यांचे नाव आज देशभरात पोहोचले आहे. दिग्दर्शक म्हणून फॅण्ड्री, सैराट या चित्रपटांमधून स्वत:चं स्थान निर्माण करणारे नागराज मंजुळे कुस्तीवर आधारित त्यांच्या नव्या चित्रपटाचे चित्रीकरण सिनेमाचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापुरात करणार आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड या नव्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊन त्याचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. हे काम संपताच नागराज यांनी नव्या मराठी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. कोल्हापुरात १५ एप्रिलपासून महिनाभर या नव्या चित्रपटाचे चित्रीकरण होणार असून, गेल्याच आठवड्यात नागराज यांनी कोल्हापुरातील विविध लोकेशन्सची माहिती घेतली आहे. त्यामध्ये पन्हाळा, गगनबावडा येथील ठिकाणे त्यांच्या टीमने निश्चित केली आहेत.
यासंदर्भात कोल्हापूरचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांच्याशी त्यांनी प्रदीर्घ चर्चा करून कोल्हापुरात सुरू होणाऱ्या या नव्या चित्रपटाच्या व्यवस्थेविषयी अंतिम बोलणी केली आहेत. नागराज यापूर्वी गेल्या महिन्यात कुस्तीवरील या नव्या चित्रपटासाठी कोल्हापुरात येऊन गेले होते.
नागराज यांनी यापूर्वी सैराटसह सायलेन्स, नाळ अशा चित्रपटांतून प्रमुख भूमिका केल्या होत्या, तर तार या लघुपटात त्यांनी खाकी शर्ट, खाकी पॅण्ट, टोपी, खांद्यावर अडकवलेली खाकी पिशवी आणि त्यात पत्रांचा गठ्ठा. त्यावरचा पत्ता वाचून घराघरापर्यंत पत्र पोहोचवणाऱ्या पोस्टमनची मुख्य भूमिकाही केली आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि नागराज मंजुळे यानिमित्ताने एकत्र आले होते. रितेश याच्या मुंबई फिल्म्स या बॅनरखाली ही शॉर्टफिल्म तयार झाली होती.
कोट
नागराज मंजुळे यांनी कोल्हापुरात येऊन त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. मराठी चित्रपटसृष्टीची जन्मभूमी असणाऱ्या आपल्या कोल्हापूरमध्ये नागराज यांच्यासारखे दिग्दर्शक चित्रीकरण करणार आहेत, हे आनंददायी आहे. यामुळे कोल्हापूरच्या मातीतील कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तरुण आमदार म्हणून त्यांच्या या प्रयत्नाला माझ्या शुभेच्छा आणि पाठबळ नक्की असेल.
- ऋतुराज पाटील, आमदार.
थोडक्यात नागराज यांचा परिचय
नागराज पोपटराव मंजुळे हे मराठी कवी आणि ‘पिस्तुल्या’ या लघुपटाचे आणि फॅण्ड्री व सैराट या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. सोलापूर जिल्ह्यातील, करमाळा तालुक्यातील जेऊर गावच्या नागराज यांचा जन्म वडार समाजात झाला. तेथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातून मराठी विषयात एम. ए. आणि पुढे एम. फिल. केले. नगरच्या महाविद्यालयात मास कम्युनिकेशनचा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रोजेक्टचा एक भाग म्हणून तयार केलेल्या पहिल्याच ‘पिस्तुल्या’ या लघुपटाला आणि त्यातील बालकलाकार सूरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय ‘पावसाचा निबंध’ या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ हा कवितासंग्रहही प्रकाशित झालेला आहे. सैराट या मराठी चित्रपटाची ६६व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील बालमेळ्यासाठी निवड झाली. त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (२०१७) मिळाला आहे.
-------------------------------------
फोटो -29032021-kol-nagraj manjule with ruturaj patil