आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर , दि. 0६ : कोल्हापूरचे सुपुत्र आणि चित्रपट दिग्दर्शक माधवराव शिंदे यांच्या जन्मशताब्दि वर्षानिमित्त कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुढाकाराने दि. १४ ते २0 मे या कालावधीत माधवराव शिंदे यांच्या चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती माधवराव शिंदे यांच्या कुटूंबियांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, दिलीप बापट, माधवराव शिंदे यांच्या कन्या माया देसाई, जावई श्रीकांत देसाई, नातू रोहित देसाई, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे रणजित जाधव, धनाजी यमकर आदी यावेळी उपस्थित होते.
कोल्हापूरचे सुपुत्र आणि चित्रपट दिग्दर्शक माधवराव शिंदे यांचे २0१६ -२0१७ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांचा परिचय आजच्या पिढीस व्हावा, तसेच त्यांचे स्मरण चिरंतन रहावे म्हणून हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या या महोत्सवात कलाकार, तंत्रज्ञ यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. शिंदे यांनी दिग्दर्शित केलेले गृहदेवता, शिकलेली बायको, कन्यादान, माणसाला पंख असतात, धर्मकन्या यासारखे पारितोषिक प्राप्त चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून यामध्ये त्यांच्या चित्रपटांच्या दृश्यांश छायाचित्रांचे प्रदर्शनही या कालावधीत भरविण्यात येणार आहे.
भालजी पेंढारकर, बाबुराव पेंढारकर, मास्टर विनायक, व्ही. शांताराम यांच्यासारख्या निर्माते-दिग्दर्शकांच्या पुढच्या पिढीतील दिग्दर्शक म्हणून माधव शिंदे यांचे नाव घेता येईल. त्यांनी दिनकर द. पाटील, लता मंगेशकर यांच्यासह सुरेल चित्र ही संस्था सुरु केली. तीच पुढे माधव शिंदे यांनी एकट्यांनी अखेरपर्यंत चालविली. सुरेल चित्रच्या गृहदेवता या चित्रपटाचे राष्ट्रपती पदक मिळवून ताश्कंद (रशिया) येथील चित्रपट महोत्सवात सलग २१ खेळ करुन मराठी सिनेमा जागतिक स्तरावर नेला. (प्रतिनिधी)