कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी दिवसभरात शहरातील ८१ प्रभागांतून २३४ उमेदवारांनी ३३७ उमेदवारी अर्ज दाखल केले. काही उमेदवारांनी हलगीच्या ठेक्यात आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीद्वारे शक्तिप्रदर्शन करत तर कोणी अत्यंत साधेपणाने जाऊन उमेदवारी अर्ज भरण्यावर भर दिला. आज, मंगळवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सातही क्षेत्रिय निवडणूक कार्यालयांत गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जादा कर्मचारी व जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम ६ आॅक्टोबरपासून सुरू झाला असून निवडणुकीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेला उमेदवारी अर्ज भरण्याचा आज, मंगळवारी शेवटचा दिवस आहे. पितृपंधरवडा, सर्वपित्री अमावास्या यामुळे बहुतांशी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे टाळले होते. आज, मंगळवारी शेवटच्या दिवशी घटस्थापनेचा मुहूर्त साधूत बहुतेक सर्वांनीच उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्धार केला आहे. ज्यांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत, असे उमेदवारही आज मुहूर्ताने अर्ज भरणार आहेत. त्यामुळे शहरातील सातही क्षेत्रीय निवडणूक कार्यालये गर्दीचा उच्चांक गाठतील, अशी अपेक्षा आहे. सोमवारी सर्वपित्री अमावास्या असूनही शहराच्या विविध प्रभागांतून २३४ उमेदवारांनी ३३७ अर्ज दाखल केले. त्यात सर्वाधिक ४१ उमेदवार गांधी मैदान कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागातील आहेत, तर सर्वांत कमी १५ उमेदवार कसबा बावडा पॅव्हेलियन अंतर्गत येणाऱ्या प्रभागातील आहेत. सोमवारी सर्वच कार्यालयांत उमेदवारी अर्ज भरण्यास तसेच माहिती घेण्यास उमेदवार व त्यांच्या नातेवाईक, समर्थकांची गर्दी झाली होती. सोमवारी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये उपमहापौर ज्योत्सना मेढे-पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव, विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव, नगरसेवक इंद्रजित सलगर, श्रीकांत बनछोडे, राजू पसारे, रोहिणी काटे, माजी महापौर कादंबरी कवाळे, दीपक पांडुरंग जाधव, महेश सावंत, यशोदा मोहिते, रेखा पाटील, भूपाल शेटे, महेश गायकवाड यांचा समावेश आहे. पद्माराजे उद्यान प्रभागातून माजी उपमहापौर विक्रम जरग, अजिंक्य शिवाजीराव चव्हाण यांनी अर्ज भरला. नगरसेविका वंदना आयरेकर यांचे पती विश्वास आयरेकर यांनी दुधाळी पॅव्हेलियनमधून, नंदकुमार सूर्यवंशी यांनी बलराज कॉलनी प्रभागातून अर्ज भरला. नगरसेवक सतीश लोळगे यांच्या पत्नी अश्विनी लोळगे यांनीही अर्ज भरला. माजी नगरसेविका संगीता सावंत व गौरव सावंत यांनी तुळजाभवानी मंदिर प्रभागातून अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश लाटकर, स्नेहल जाधव, तर कॉँग्रेस उमेदवार संजय मोहिते यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. हलगीच्या ठेक्याने मिरवणुकीतील वातावरण संचारले होेते. (प्रतिनिधी)
अर्ज भरण्यासाठी आज अखेरची झुंबड
By admin | Published: October 13, 2015 1:04 AM