कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतून आज अकरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये ‘डमी’ म्हणून अर्ज भरलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. अर्ज मागे घेण्याचा उद्या, बुधवारी शेवटचा दिवस असून त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत बहुरंगी लढती होणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, भाकप, शेकाप, जनसुराज्य, बसप अशा विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.चंदगड विधानसभा मतदारसंघातून रामकृष्ण गोपाळ पाटील आणि राजेंद्र गणपती परीट या दोन उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली. कागल विधानसभा मतदारसंघातून आज युवराज दत्ताजीराव पाटील, बाळासो मल्हारी पाटील आणि अविनाश आण्णासाहेब मगदूम या तीन अपक्ष उमेदवारांनी, तर काल अंबरिशसिंह संजय घाटगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून प्रतिमा सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.करवीर व राधानगरी विधानसभा मतदारसंघांतून आज एकाही उमेदवाराने अर्ज माघारी घेतला नाही. मात्र, काल सोमवारी करवीरमधून श्रीमती शैलाबाई शशिकांत नरके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून वैशाली राजेश क्षीरसागर यांनी, तर शाहूवाडी मतदारसंघातून आज भाग्यश्री कर्णसिंह गायकवाड यांनी, तर काल, सोमवारी विनय निवृत्ती टिळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हातकणंगले मतदारसंघातून युवराज शिवाजी कांबळे यांनी, इचलकरंजी मतदारसंघातून शाहूगोंडा सतगोंडा पाटील यांनी, तर शिरोळ मतदारसंघातून गणपतराव आप्पासाहेब पाटील या एका उमेदवाराने त्यांचा अर्ज मागे घेतला. (प्रतिनिधी)
अंतिम लढती आज ठरणार
By admin | Published: October 01, 2014 1:14 AM