आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २७ : वस्तू व सेवाकर (जीएसटी) प्रत्यक्षात लागू होण्यास तीन दिवस उरले आहेत. पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागात जीएसटीबाबतच्या जनजागृतीचे काम विक्रीकर विभागाने वेगाने सुरू आहे. जनजागृतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू आहे.
जीएसटीच्या स्वागतासाठी शनिवारी (दि. १ जुलै) विशेष कार्यक्रम घेण्याचे नियोजन कोल्हापूर विभागाकडून सुरू आहे. याबाबत कोल्हापूर विभागाचे विक्रीकर सहआयुक्त विलास इंदलकर यांनी सांगितले की, ‘जीएसटी’ चे स्वरूप, त्यातील तरतुदी, नियमावली आदींबाबत व्यापारी, व्यावसायिक, नागरिकांना माहिती देणे आणि जनजागृतीचे काम हे कोल्हापूर विभागात मे महिन्यापासून सुरू आहे. याअंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग येथे जनजागृतीची ४० हून अधिक शिबिरे घेतली आहेत.
जीएसटीच्या नोंदणीबाबत विक्रीकर कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केला आहे. इचलकरंजी येथील कापड विक्रेत्यांंना जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी याठिकाणी रोटरी क्लब येथे मार्गदर्शन आणि सुविधा केंद्र सुरू केले आहे. जनजागृतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू आहे. जीएसटीतील काही नव्या नियमांची सध्या विक्रीकर विभागातील अधिकाऱ्यांना माहिती दिली जात आहे. त्यांचे प्रशिक्षण देखील सुरू आहे.
विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा येथील प्रत्येकी २५० आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील प्रत्येकी १५० महा ई-सेवा केंद्रचालकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. जीएसटीच्या स्वागतासाठी शनिवारी विशेष कार्यक्रम घेण्याच्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. नवीन नोंदणी सुरू जीएसटीसाठी आतापर्यंत कोल्हापूर विभागातील जुन्या व्यापारी, व्यावसायिकांची नोंदणी ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे. याअंतर्गत ८१ हजार जणांनी नोंदणी केली आहे. नवीन नोंदणीची प्रक्रिया रविवार (दि. २५) पासून सुरू झाली असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे विक्रीकर सहआयुक्त विलास इंदलकर यांनी दिली.