कोल्हापूर : येथील बारा तालुक्यांतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आतापर्यंत २,२०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तसेच रिक्त असलेल्या सुमारे ८०० जागांसाठी अंतिम समुपदेशन फेरी शुक्रवारपासून सुरू झाली आहे. याअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत सोमवार, दिनांक ४ जानेवारीपर्यंत आहे.
आयटीआयमध्ये फिटर, वेल्डर, मेकॅनिकल, शिटमेटल अशा विविध अभ्यासक्रमांच्या एकूण ३ हजार जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया दिनांक १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. आतापर्यंत पाच प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यातून २,२०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. समुपदेशन फेरीचा कालावधी दिनांक १ ते ३१ डिसेंबर असा होता. या फेरीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही फेरी शुक्रवारपासून सुरू झाली असून, त्यात ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात दुरूस्ती आणि प्रवेश अर्ज शुल्क जमा करता येणार आहे. तसेच उपलब्ध जागांचा तपशील आयटीआयच्या संकेतस्थळावर शनिवार, २ रोजी प्रसिध्द होणार आहे. या समुपदेशन फेरीसाठीची संस्थानिहाय गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता प्रकाशित केली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी बुधवारी आणि गुरूवारी प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे.
चौकट
यंदाच्या नव्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू
अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचे वर्ग दिनांक १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले. यावर्षी पाचव्या फेरीपर्यंत प्रवेशित झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण वर्ग शुक्रवारपासून सुरू झाले आहेत.
प्रतिक्रिया
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रवेश अर्ज सादर करणे व प्रवेश अर्जात दुरुस्तीची सुविधा शुक्रवारपासून उपलब्ध करुन दिली आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रवेश प्रक्रियेमध्ये भविष्यात होणारे बदल आणि सुधारणा, सुधारित वेळापत्रक विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
- आर. एस. मुंडासे, प्राचार्य, आयटीआय कळंबा.