कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेल्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या तसेच हरकतींसंदर्भातील अहवाल आज, बुधवारी राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर आयोग ठरवून देईल त्या तारखेला या याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असे महापालिका सूत्रांनी सांगितले.
महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पूर्वतयारी म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागरचना, आरक्षणे तसेच प्रभागनिहाय प्रारूप व अंतिम मतदार याद्या तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. अंतिम मतदार याद्या आज, बुधवारी प्रसिद्ध करायच्या होत्या; परंतु मतदार याद्यांतील घोळ आणि त्यावर आलेल्या हरकतींची संख्या मोठी असल्याने तसेच त्या दुरुस्त करण्यास वेळ कमी असल्याने याद्यांचे काम मंगळवारी पूर्ण झाले नाही.
अंतिम मतदार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, आज, बुधवारी ते पूर्ण होईल. त्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल आयोगास पाठविला जाणार आहे. आयोगास या याद्या मिळाल्यानंतर त्यांच्याकडून कधी प्रसिद्ध करायच्या आहेत त्याची तारीख निश्चित करून दिली जाईल. त्यावेळी त्या प्रसिद्ध केल्या जातील, असे सांगण्यात आले.
महापालिकेची सर्व तयारी पाहता निवडणूक एप्रिल महिन्यात होईल अशी चर्चा होती; परंतु कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने राज्य सरकारने पाच महापालिकेतील प्रशासकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक पुढे जाणार हे स्पष्ट झाले. आता ही निवडणूक नोव्हेंबरमध्ये होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.