कोगनोळी : महाराष्ट्र व केरळमधील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्वच प्रवासी वाहनांना कोविड प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. प्रमाणपत्र नसणाऱ्या प्रवासी वाहनांना महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी फाटा येथून परत पाठविण्यात येत आहे.
दोनच दिवसांपूर्वी कोगनोळी फाटा येथील टोलनाक्याजवळ तपासणी पथकाची उभारणी करून कोविड प्रमाणपत्र सक्तीचे करत असल्याबाबत तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने सोमवारी सकाळपासूनच कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्वच प्रवासी वाहनांना कोविड प्रमाणपत्र सक्तीचे केले. प्रमाणपत्र नसणाऱ्या सर्वच प्रवासी वाहनांना कोगनोळी फाटा येथून परत महाराष्ट्रात पाठविण्यात आले. या सीमेवरील तपासणी नाक्यावर बंदोबस्तासाठी चिक्कोडीचे पोलीस उपअधीक्षक मनोज कुमार नायक, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ, ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या तपासणी नाक्यावर दिवसभर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, अप्पर पोलीस उपअधीक्षक अमरनाथ रेड्डी आदींनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत
महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी फाटा येथून कोविड प्रमाणपत्र नसणाऱ्या सर्व प्रवासी वाहनांना परत पाठीमागे पाठवण्यात येत आहे. त्यामुळे हा परिसर संवेदनशील बनला आहे. या परिसरावरती लक्ष ठेवून राहण्यासाठी दोन सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.