आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २९: खासगी सावकार, आणि कर्मचारी संघाच्या कथित पदाधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडलेल्या मारुती गोविंद कांबळे या सेवानिवृत्त झाडू कामगारास अखेर महानगरपालिका प्रशासनाकडून न्याय मिळाला. कांबळे यांच्या हक्काची ८३ हजार २०० रुपये इतकी ग्रॅच्युएटीची रक्कम त्यांना धनादेशाद्वारे मिळाली.
महानगरपालिका आरोग्य विभागाकडे झाडू कामगार असलेले मारुती गोविंद कांबळे हे २९ फेब्रुवारी २०१६ रोजी निवृत्त झाले. परंतु त्यांना त्यांच्या हक्काची ग्रॅच्युएटीची रक्कम देण्यास प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. आरोग्य कर्मचारी पतसंस्थेची ना हरकत दाखला आणण्याचे त्यांना बंधन घातले गले. कांबळे यांच्या नावावर पतसंस्थेचे कर्ज होते, परंतु ते त्यांचे चिरंजीव संजय यांनी फेडले. तरीही पतसंस्था प्रशासनाकडून ना हरकत दाखल दिला जात नव्हता. आणि मनपा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तो आणल्याशिवाय ग्रॅच्युएटीची रक्कम देणार नाही अशी आठमुठी भुमिका घेतली.
मारुती कांबळे सध्या आजारी असल्याने त्यांच्या कुटुंबाकडून मनपा अधिकारी, पतसंस्था अध्यक्ष यांना वारंवार विनंती केली. तरीही त्यांची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मारुती कांबळे यांना १८ मे रोजी आजारी अवस्थेतच आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची दयनिय अवस्था, आणि उंच जीने यामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्या सर्वांनी आयुक्तांच्या गाडीजवळच ठिय्या मारला. त्यानंतर प्रभारी सहायक संचालक संजय भोसले, अस्थापना अधीक्षक विजय वणकुद्रे यांनी त्यांची भेट घेऊन दोन दिवसात तुमची रक्कम देतो असे आश्वासन दिले. त्यानुसार गुरुवारी ही रक्कम त्यांना अदा करण्यात आली. कांबळे यांची जी ससेहोलपट झाली त्यातून महापालिका वर्तुळातील खासगी सावकारीवर प्रकाशझोत पडला. खासगी सावकारांच्या पिळवणुकीमुळे मनपा प्रशासनातील अधिकाऱ्यांची ग्रॅच्युएटीची रक्कम दिली गेली नसल्याचे स्पष्ट झाले.