‘माणगावात बाधितांचा मुक्तसंचार’ या ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेत माणगाव ग्रामपंचायतीने तातडीचे पाऊल उचलत कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबीयांना योग्य ती दक्षता घ्यावी अन्यथा कायदेशीर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. ‘लोकमत’मध्ये बुधवार दि. ५ रोजी वृत्त प्रसिध्द होताच हे वृत्त दिवसभर भ्रमणध्वनीवर प्रसारित होत होते.
माणगाव येथील कोरोनाबाधित कुटुंबातील रुग्ण व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य खुलेआम गावात व परिसरात फिरत असल्याबद्दलचा संताप नागरिकांतून व्यक्त होत होता. याशिवाय एक कोरोनाबाधित रुग्णाने येथील परिचारिकांशी हुज्जतही घातली होती. हा रुग्ण खुुुुलेआम फिरत असताना येथील दक्षता समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या.
या घटनेची दखल घेत ‘लोकमत’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिध्द करताच सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, पोलीसपाटील करसिध्द जोग, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील मन्ने यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना कायदेशीर नोटीस लागू करून कोरोनाबाधित रुग्ण व संपर्कातील कुटुंबातील सर्व सदस्य जरी कोणतीही लक्षणे नसतील तरीही वीस दिवस अलगीकरणासह कोरोनाबाधित रुग्ण किंवा घरातील अन्य सदस्य घराबाहेर पडल्यास पाच हजार रुपये दंड व गुन्हे दाखल करण्याचा आणि घरावर कोविड प्रतिबंधित फलक लावण्याची नोटीस लागू केली.
दरम्यान, बुधवार रोजी दिवसभर ग्रामपंचायत प्रशासनाने बुधवारी रात्री बारा वाजल्यापासून रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत गाव बंद करण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची ध्वनिक्षेपकावरून गावभर दवंडी दिली आहे.