कोल्हापूर : शहर वाहतूक शाखेने गंगावेेश, शुक्रवार पेठ पोलीस चौकी ते छत्रपती शिवाजी चौक पूल हा मार्ग अखेर शुक्रवारी एकेरी करण्यात आला. या मार्गावर अमृत योजनेतून पाईपलाईन व ड्रेनेजचे काम सुरू आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून अपघात होऊ नयेत म्हणून हा मार्ग एकेरी करावा, अशी मागणी आखरी रास्ता समितीतर्फे करण्यात आली होती. याचबरोबर शहरात सकाळी १० ते रात्री १० या वेळेत जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
शहरातून साखर कारखान्याकडे ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांना यापूर्वीच सकाळी सहा ते रात्री दहा या वेळी प्रवेश बंद करण्यात आला आहे. रस्ता दुरुस्तीच्या कारणास्तव फुलेवाडी, रंकाळा टॉवर, गंगावेश, शुक्रवार पेठ पोलीस चौकीमार्गे शिवाजी पुलाकडे जाणारी सर्व वाहने, उसाचे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जड, अवजड वाहने यांना पुलाकडे जाण्यास रात्री १० ते सकाळी १० या वेळेत परवानगी देण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग
शिवाजी पुलाकडून येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी : तोरस्कर चौक, सीपीआर चौक, माळकर सिग्नल चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गंगावेश या मार्गांनी पुढे सोडण्यात येईल.
शिवाजी पुलाकडून येणारी वाहने : तोरस्कर चौक, सीपीआर चौक, व्हीनस कॉर्नर चौक, दाभोळकर सिग्नल ते ताराराणी चौकमार्गे सोईनुसार वाहनांना पुढे जाता येईल.
चौकट
कसबा बावडा व तावडे हॉटेलमार्गे येणारी अवजड वाहनांना प्रतिबंधित केलेल्या वेळेशिवाय कसबा बावडा, भगवा चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, पितळी गणपती, धैर्यप्रसाद, ताराराणी चौक, रेल्वे ओव्हरब्रिज, हायवे कॅन्टीन, सायबर चौक, संभाजीनगर रिंग रोडकडे मार्गस्थ केले जाणार आहे.
बातमीदार : विनोद