कोल्हापूर : आज होणार, उद्या होणार, अशी रोज हुलकावणी देत असलेला कोल्हापूर शहरातील वादग्रस्त रस्ते प्रकल्पातील टोल अखेर आज, सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सर्वच नऊही नाक्यांवर सुरू झाला. राज्य शासनाने रस्ते प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमल्याने ते होईपर्यंत टोलवसुली करू नये, असे कोल्हापूरचे दोन्ही मंत्री अनुक्रमे हसन मुश्रीफ व सतेज पाटील आणि पालकमंत्री हर्षवर्धन पाटील हे सांगत असूनही त्यांच्या नाकावर टिच्चून आयआरबी कंपनीने टोल वसुली सुरू केली. गेल्या तीन वर्षांत तिसऱ्यांदा टोल सुरू झाला आहे. यामुळे टोलविरोधी कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. सायंकाळी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिरोली जकात नाक्यावरील कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले व टोल वसुली बंद पाडली. उर्वरित नाक्यांवर मात्र टोलवसुली सुरू राहिली. अपुरी कामे असल्याने टोलवसुली करता येणार नाही या मुद्द्यावर टोलविरोधी कृती समितीच्या याचिकेवर २७ फेब्रुवारीस उच्च न्यायालयाने टोलवसुलीस स्थगिती दिली. त्याविरोधात कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी स्थगिती उठविली व जुलैअखेरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. परंतु, त्यावेळी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने कंपनीने वसुलीचे धाडस केले नव्हते. ती पार पडल्यावर कंपनीच्या हालचाली नेटाने सुरू झाल्या; परंतु पोलीस बंदोबस्त मिळत नव्हता. या हालचाली पाहून परवाच ९ जूनला सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने मोठा मोर्चा काढून टोलवसुली कराल तर याद राखा, असा दम कंपनी व राज्य सरकारलाही दिला होता. परंतु तरीही कंपनीच्या हालचाली थांबलेल्या नव्हत्या. गेल्या बुधवारीच पोलीस बंदोबस्त दिल्यावर टोलवसुली सुरू करण्याची तयारी कंपनीने केली होती; परंतु त्यादिवशी तो सुरू झाला नाही. त्याच्या आदल्याच दिवशी राज्य शासनाच्या सूचनेवरून रस्ते विकास महामंडळाने रस्ते प्रकल्पाच्या तपासणीसाठी तज्ज्ञ समिती नियुक्त केली. ही समिती अजून पाहणी करण्यासाठी कोल्हापूरला आलेली नाही तोपर्यंत टोल सुरू झाल्याने लोकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सर्वच नाक्यांवर टोलच्या पावत्या अचानक सुरू झाल्या. कंपनीची तयारी होतीच. नाके सज्ज होते. फक्त संगणकाऐवजी हाताने लिहून पावत्या देण्यात येत होत्या. वसुलीसाठी आणलेले कर्मचारीही सांगली, कराडचे होते. त्यांनी जे वाहनधारक टोल देत होते त्यांच्याकडूनच ते स्वीकारत होते. कोल्हापुरातील लोक (एम.एच.-०९ च्या गाड्या) टोल न देताच गाडी पुढे दामटत होते. फुलेवाडी नाक्यावर शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी वसुली कर्मचाऱ्यांना दादागिरी करायची नाही, असे बजावले. टोलविरोधी कृती समितीने वसुलीस तातडीने विरोध केला नाही. दोन दिवसांत बैठक घेऊन पुढील रणनिती निश्चित करणार असल्याचे समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी सांगितले.
...अखेर पावती फाटली; टोल सुरू
By admin | Published: June 17, 2014 1:28 AM