कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून गतवर्षी १४ जुलैला झालेल्या तोडफोडीनंतर गेले पाच महिने गडावर भाविक व पर्यटनासाठी घातलेली बंदी मंगळवारी शाहूवाडी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी अटी व शर्ती घालून उठवली. महसूल व पोलिस प्रशासनाने लागू केलेल्या नियमांना बांधील राहून सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विशाळगडावर पर्यटन व दर्शनासाठीची परवानगी देण्याचे आदेश त्यांनी दिले.या आदेशात ५ ते ३१ जानेवारीपर्यंत बंदी कायम ठेवून, दिवसा गडावर देवदर्शन व पर्यटनाला परवानगी दिली आहे. अतिक्रमणाच्या वादावरून जुलैमध्ये झालेल्या दंगलीमुळे विशाळगडाच्या सात किलोमीटरवर असलेल्या केंबुर्णेवाडीपासून संचारबंदी असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले होते. पर्यटन ठप्प झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पर्यटन सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी होती.पर्यटनाला परवानगी दिल्याने गडासह गजापूर पंचक्रोशीने सुटकेचा नि:श्वास सोडला. याबाबत शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी कायदा सुव्यवस्थेची दक्षता म्हणून प्रत्येकाची तपासणी करूनच दिवसा गडावर केवळ देवदर्शनासाठी जाता येईल. पाचनंतर गडावर कोणालाही थांबता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
हे आहेत नियम
- कोणालाही गडावर राहता येणार नाही
- संघटना किंवा जमावाला कोणत्याही प्रकारचा धार्मिक किंवा ऐतिहासिक कार्यक्रम परवानगीशिवाय घेता येणार नाही.
- कार्यक्रमासाठी पोलिस प्रशासनासह स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्व परवानगी आवश्यक
- पशुहत्या बंदी असल्याने तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किल्ल्यावर मांसाहारी पदार्थ नेणे किंवा शिजवून तयार करणे यावर बंदी असेल.
- केंबुर्णेवाडी येथे वाहनांची तपासणी करूनच दर्शनासाठी सोडले जाईल.