कडगाव : कडगाव (ता. भुदरगड) येथील युवराज देसाई याने आपल्या लग्न समारंभानिमित्ताने व सिद्धेश देसाई याने आपल्या वाढदिवसानिमित्ताने कडगाव येथील प्राथमिक शाळेला आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली. परिसरातून या युवकांनी दाखवलेल्या दातृत्वाचे कौतुक होत आहे.
कोरोनाचे सावट दिवसेंदिवस वाढत असल्याने अत्यल्प स्वकीयांच्या उपस्थितीत युवराज देसाई यांचा लग्न सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने शाळेसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय युवराज व त्यांचे जेष्ठ बंधू राहुल देसाई यांनी घेतला व ५५,५५५ रुपयांचा धनादेश शाळेसाठी दिला. तसेच सिद्धेश देसाई यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने २५ हजार रुपयांचा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक डी. के. सावंत व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांच्याकडे दिला.
या जमा होणाऱ्या रकमेतून शंभर टक्के बोलक्या भिंती, डिजिटल वर्ग, ज्ञानरचनावादी शिक्षण व शाळा सुशोभिकरण करण्यात येणार आहे. विद्यामंदिर, कडगाव ही केंद्रशाळा परिसरातील नावाजलेली शाळा असून, येथील माळितले देसाई सरकार यांनी आपली कोट्यवधी रुपयांची जागा शाळेसाठी देऊ केली आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, अवधूत देसाई, सविता देसाई, अमर पाळेकर, राहुल देसाई, दिगंबर देसाई, शीतल गुरव, गजानन देसाई, बाजीराव देसाई, गुरुप्रसाद सतोसे, सुरेश जाधव, रॉबिन डिसोझा, योगेश देसाई, दिगंबर देसाई, विष्णू गुरव, अमोल डेळेकर, आदी उपस्थित होते.
फोटो : आपल्या वाढदिवसानिमित्ताने पंचवीस हजारांच्या मदतीचा धनादेश शाळेसाठी मुख्याध्यापक डी. के. सावंत व राजेंद्र देसाई यांच्याकडे सिद्धेश देसाई यांनी दिला.