पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे बुलढाण्यातील मलकापूर येथील संजयसिंह रजपूत या शहीद जवानाची आई व भावाकडे साडेपाच लाखांचा धनादेश देण्यात आला.
कोल्हापूर : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबीयांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रत्येकी साडेपाच लाखांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा येथे जाऊन जवानांच्या कुटुंबीयांकडे या रकमेचा धनादेश सुपूर्द केला.काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आणि शहिदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी नागरिक सरसावले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनेदेखील महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी ११ लाखांच्या निधीची घोषणा केली होती.समितीचे सदस्य बी. एन. पाटील मुगळीकर, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार, मिलिंद घेवारी यांनी बुलढाणा दौरा केला. तेथील लोणार तालुक्यातील नितीन शिवाजी राठोड या शहीद जवानाच्या आई-वडिलांकडे, तसेच मलकापूर येथील संजयसिंह रजपूत या शहीद जवानाची आई व भावाकडे प्रत्येकी साडेपाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला.